Jitendra Awhad, Parinay Fuke  Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Politics : 'या' आमदाराने काढली आव्हाडांची लायकी आणि उंची, म्हणाले...

Sachin Fulpagare

Maharashtra Politics Latest News : भाजप महाराष्ट्रात स्वबळावर लढणार आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. यावरून आमदार परिणय फुके यांनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिले आहे.

प्रसिद्धीत राहण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी जितेंद्र आव्हाड वायफळ काहीतरी आरोप-प्रत्यारोप करत असतात. त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघितले पाहिजे. आपल्या पक्षातील मोठे नेते का सोडून गेले? याचे चिंतन करण्याचे सोडून ते भाजप आणि संघावर आरोप करत आहेत. भाजपवर आरोप केला हे समजू शकतो. कारण आम्ही सत्तेत आहोत आणि ते विरोधी पक्षात आहेत. पण संघावर आरोप करण्याची तुमची लायकी नाही, तुमची उंचीही नाही. कशाला तुम्ही संघावर आरोप करता? आपला पक्ष बघा आणि पक्ष का फुटला यावर चिंतन करा, असा टोला परिणय फुके यांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला आहे.

भाजपमधील कुणीतरी आपल्याला माहिती दिल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे. यावर परिणय फुके यांनी उत्तर दिले आहे. असे काही झालेले नाही. यावेळेस इतिहासात पहिल्यांदा सर्वच पक्षाच्या आमदारांनी हेडगेवार स्मारकाच्या ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेतला. सर्वांची एक बैठक होऊन चिंतनही झाले. महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आणि विकासासंदर्भात संघाकडून सांगण्यात आले. यात कुठल्याही राजकीय मुद्द्यावर चर्चा झाली नाही. पुढच्या निवडणुका कशा होणार किंवा काय होणार? यावर कुठलीही चर्चा झाली नाही. जितेंद्र आव्हाड कुठून काय-काय आणतात यावर संशोधनाची गरज आहे, अशी टीका फुके यांनी केली.

दोन पक्ष फुटलेत आता तिसरा पक्ष फुटणार आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. यावरही फुके यांनी टोला लगावला आहे. दोन पक्ष झाले. तिसरा पक्ष काँग्रेस आहे, असा त्यांचा आरोप आहे. पण त्यांनी आपसात ठरवून घ्यावे. त्यांची 'इंडिया' आघाडी किती दिवस टिकणार हे त्यांनी बघून घ्यावे. तिसरा पक्ष काँग्रेस आहे की परत राष्ट्रवादी आहे? हे त्यांनी सांगावे, असा सवाल परिणय फुके यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निधी वाटप करताना सरकार सर्वच पक्षांच्या आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. सत्ताधारी आमदारांना जास्त निधी मिळणार आणि विरोधी पक्षांतल्या आमदारांना कमी निधी मिळणार हे साहजिकच आहे. उलट महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांत या लोकांनी काय केले? भाजपच्या आमदारांना 1 रुपयाही निधी दिला नाही. आज हे आमच्याकडून अपेक्षा करत आहेत. जे तुम्ही आधी केले, तेच आता तुम्हाला मिळणार आहे. हे त्यांनी समजून घ्यावे, असे परिणय फुके म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT