Kunbi Certificate For Maratha Reservation Google
विदर्भ

Maratha Reservation : कुणबी प्रमाणपत्रांची कार्यपद्धती ठरविण्यासाठी शिंदे समिती येणार विदर्भात

Searching Records : पूर्व विदर्भासाठी नागपुरात, पश्चिम विदर्भासाठी अमरावती आयुक्तालयात बैठक

प्रसन्न जकाते

Nagpur News : मराठा आरक्षण विषयावर काम करणाऱ्या न्यामूर्ती संदीप शिंदे यांची समिती कुणबी जात प्रमाणपत्रांची कार्यपद्धती ठरविण्यासाठी विदर्भात येणार आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसाठी नागपूर तर पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांसाठी अमरावती विभागीय महसूल आयुक्तालयात बैठक घेण्यात येणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यातून सध्या मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींकडून नोंदी, पुरावे व कागदपत्र मागविण्यात येत आहेत.

न्या. शिंदे २१ नोव्हेंबरला नागपुरात पोहोचणार आहेत. त्यानंतर ते विभागीय आयुक्तालयात पूर्व विदर्भातील अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या काळात पूर्व विदर्भातील नोंदींबाबत पडताळणी होणार आहे. २२ नोव्हेंबरला न्या. शिंदे अमरावती येथे पश्चिम विदर्भातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या भागातील नोंदींबाबत पडताळणी करणार आहेत. (Justice Sandeep Shinde Committee to Visit Nagpur & Amravati For Maratha Reservation)

अमरावती येथील पडताळणी आटोपल्यानंतर २३ नोव्हेंबरला पुन्हा नागपुरात प्रमाणपत्रांच्या वाटपाबाबत बैठक घेण्यात येणार आहे. मराठा समाजाला मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने अभिलेखांची तपासणी, तसेच नोंदी प्रशासनाकडून तपासण्यात येत आहेत. मराठा समाजाला मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व कार्यालयांमध्ये अभिलेख तपासणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयस्तरावर पेरेपत्रक, कुळ नोंदवही, हक्क नोंद पत्रक, कोतवाल बुकांची नक्कल, टिपण बुक, योजना बुक तपासणी करण्यात येत आहे. अभिलेखांची तपासणी व अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही ठराविक कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार १९४८ ते १९६७ या कालावधीतील नोंदी तपासण्यात येत आहेत. या तपासणीमध्ये मराठा- कुणबी, कुणबी- मराठा अशा अनेक नोंदी आढळल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आढळलेल्या नोंदीच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मात्र हे प्रमाणपत्र देण्याबाबत नेमकी कशी प्रक्रिया करायची, यासंदर्भात न्या. संदीप शिंदे हे अधिकाऱ्यांना सूचना करणार आहेत. कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी आढळल्या, त्यातील किती वैध आहेत व त्या आधारावर किती प्रमाणावर जात प्रमाणपत्र वाटप करावे लागणार आहे, याचा आढावाही न्या. शिंदे घेणार आहेत. न्या. शिंदे यांच्या या विदर्भ दौऱ्याच्या दृष्टीने योग्य तो बंदोबस्तही तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT