Archana Deshmuk News : विदर्भातील काटोल नगर परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला नगराध्यक्षपद देण्यात आल्याने महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. राज्याचे माजी गृहमंत्री तसेच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांचे सुपुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्या सलील देशमुख यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामासुद्धा दिला होता.
असे असतानाही शेकापच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना राहुल देशमुख यांनी विजय मिळवला आहे. अनिल देशमुखांचा बालेकिल्ला उध्वस्त करणाऱ्या भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर यांची जादू अवघ्या वर्षभराच्या आतच ओसरल्याचे या निकालावरून दिसून येते.
काटोल विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सलील देशमुख यांना उमेदवार दिली होती. त्यांच्या विरोधात भाजपने चरणसिंग ठाकूर यांना लढवले होते. शेकापचे नेते राहुल देशमुख यांनीही निवडणूक लढवली होती. भाजपच्या ठाकूर यांनी काटोलमध्ये देशमुख मोडून काढत धक्कादायक विजयाची नोंद केली होती.
नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने झाले गेले विसरून शेकापही आघाडी केली. राहुल देशमुख यांच्या पत्नी अर्चना देशमुख यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार केले. याकरिता अनिल देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. मात्र हा निर्णय सलील देशमुख यांना पटला नाही. त्यांना अर्चना देशमुख यांच्या नावाला विरोध दर्शवला. ज्याने आपल्या विरोधात निवडणूक लढली त्याला पाठिंबा देणार नाही, प्रचार करणार नाही असे त्यांनी जाहीर केले.
यानंतरही अनिल देशमुख आपल्या निर्णयावर ठाम राहिले. याचा राग आल्याने सलील देशमुख यानं राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. पत्रकार परिषद घेऊन ऐन निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. आजारपणामुळे आपण सहा महिने आराम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते. यावरून मोठी खळबळ उडाली होती.
देशमुख कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे नागपूरला येऊन गेल्या. त्यांनी सलील देशमुख यांची समजूत काढली. त्यानंतर देशमुखांनी आपला निर्णय फिरवला. अर्चना देशमुख यांना वगळून त्यांनी काही ठिकाणी प्रचार सभा घेतल्या होत्या. प्राप्त झालेल्या माहितीनुसार शरदचंद्र पवार व शेकाप आघाडीचे १० तर भाजपचे आठ नगरसेवक येथून निवडून आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.