kidney selling racket Sarkarnama
विदर्भ

kidney selling racket : सावकाराचा फास, किडनी विक्रीची वेळ; महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कोलकत्तापासून कंबोडियापर्यंत मोठं रॅकेट

Kidney Selling Racket for Loan Repayment Spreads from Maharashtra to Cambodia, Chandrapur Police Probe : सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकणारे रॅकेट समोर आले असून, चंद्रपूर पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून तपास सुरू केला आहे.

Pradeep Pendhare

Organ Trafficking Racket : सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकण्यामागे देशात मोठं रॅकेट समोर आलं आहे. हे रॅकेट चंद्रपूरपासून सुरू होऊन, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कोलकत्तासह कंबोडियापर्यंत जाऊन पोहोचलं आहे.

या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी आठ जणांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे. अपर पोलिस अधीक्षक ईश्वर काटकडे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक तपास करणार आहे.

सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकणाऱ्या रोशन कुडे प्रकरणात या रॅकेटची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुडे यांच्यासोबत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र (Maharashtra) तसेच इतर दोन राज्यांतील आणखी चार युवक कंबोडियात जाण्यासाठी निघाले होते. मात्र महाराष्ट्रातील नाशिक इथंला एक युवक कोलकाता विमानतळावरून पळून आला. कुडे व अन्य तिघे कंबोडियात गेले आणि त्या चौघांची किडनी तिथं काढण्यात आली.

या नवीन माहितीमुळे मानवी अवयव तस्करीचे मोठे रॅकेट देशात सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर इथले रोशन कुडे यांनी 2 फेब्रुवारी 2021 रोजी ब्रह्मपुरी इथल्या एका सावकाराकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यावरील व्याज व दंड वाढत ती रक्कम कित्येक लाखांत गेली. अखेर कर्ज चुकविण्यासाठी कुडेंनी किडनी विकण्याचा निर्णय घेतला.

फेसबुकवरील ‘किडनी डोनर कम्युनिटी’तील डॉ. कृष्णा यांच्या संपर्कात कुडे आले. त्यानंतर ते कंबोडियाला गेले आणि तिथं किडनी विकली. कंबोडियातील नोम पेन्ह शहरात 14 ऑक्टोबर 2024 रोजी कुडे यांच्यावर किडनी काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. पोलिस चौकशीत डॉ. कृष्णा यांच्या माध्यमातून कुडे यांच्यासह पाच युवक कंबोडियाला जाण्यासाठी कोलकाता विमानतळावर पोहोचले होते. डॉ. कृष्णा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक इथल्या एका युवकाचाही समावेश होता.

या सर्वांना डॉ. कृष्णा यांनी विमानतळावरील इमिग्रेशन काऊंटरवर प्रत्येकी 300 डॉलर दिले. ते हातात पडताच नाशिकच्या युवकाचे मन बदलले आणि त्याने विमानतळावरून पळ काढला. उर्वरित युवकांची किडनी कंबोडियात काढण्यात आली. दरम्यान, कुडे गावात परतल्यानंतर डॉ. कृष्णा व्हॉट्सॲपवर त्यांच्या संपर्कात होते. कुडे यांनी स्वतःच्या भावालाही किडनी विकण्यास प्रवृत्त केले होते. मात्र ऐनवेळी त्याने नकार दिल्याने पुढील अनर्थ टळला.

शस्त्रक्रियेनंतर आठ लाख रुपये कुडे यांच्या पत्नीच्या खात्यात देशातील वेगवेगळ्या चार बँक खात्यांतून वळते करण्यात आले. कुडे यांच्या मोबाइलचा सीडीआर अहवाल पोलिसांच्या हाती आला, असून त्यातून रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आणखी दोन जणांची ओळख पटली आहे. काही छायाचित्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. डॉ. कृष्णा हाती लागल्यानंतर या किडनी तस्करीच्या रॅकेटचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, हे समोर येईल. डॉ. कृष्णा आणि इतर दोघांच्या अटकेसाठी पोलिस पथक रवाना झालं आहे.

बच्चू कडू आज कुडे यांची भेट घेणार

प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू हे कुडे मिंथूर इथं जाऊन कुडे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, फरार आरोपी मनीष पुरुषोत्तम घाटबांधे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दुसरीकडे, पोलिसांच्या चौकशीत लक्ष्मण उरकुडे यांची एक डायरी सापडली असून त्यात कुडे यांच्याकडून घेणे असलेली तसेच आलेल्या रकमेची नोंद आहे. या प्रकरणातील काही आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. प्रदीप बाळबुधे यांच्यावर हुंडाबळी आणि अत्याचारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. किशोर बानकुळे यांच्यावरही गुन्ह्याची नोंद आहे.

समाज माध्यमांवर बनावट आयडी

कंबोडियात किडनी दिल्यानंतर जून 2025मध्ये रोशन कुडे लाओस देशाची राजधानी व्हिएनतियान इथं गेले. तेथील एका कॉल सेंटरमध्ये त्यांनी 17 दिवस नोकरी केली. या कॉल सेंटरच्या माध्यमातून समाज माध्यमांवर बनावट आयडी तयार करून देश-विदेशातील लोकांना संपर्क करून, गळाला लावण्याचे काम केले गेले. यासाठी कुडे यांना दरमहा सुमारे सहा हजार युआन (भारतीय चलनात सुमारे 72 हजार रुपये) देण्याचे ठरले होते. मात्र काम न जमल्याने त्यांना तेथून काढून टाकण्यात आले. यानंतर त्यांनी आणखी एका कॉल सेंटरमध्ये नोकरीचा प्रयत्न केला, मात्र तोही निष्फळ ठरला.

डांबून ठेवलेल्या कुडेंची वडेट्टीवारांमुळे सुटका

दरम्यान, ज्या एजंटच्या माध्यमातून रोशन कुडे लाओसला पोहोचले होते. त्या एजंटने दीड लाख रुपयांसाठी त्यांचा पासपोर्ट काढून घेत, डांबून ठेवले. अखेर काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून हस्तक्षेप करून कुडे यांची सुटका केली आणि ते भारतात परतले. सध्या कुडे दुबईला नोकरीसाठी जाण्याच्या तयारीत असून लखनौ इथल्या एका एजंटकडे त्यांचा पासपोर्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT