Nagpur Political Sarkarnama
विदर्भ

Krupal Tumane : मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला; अखेर तुमाने आणि भावना गवळींचे राजकीय पुनर्वसन

Rajesh Charpe

Nagpur Political News : राजकारणात भरमसाठ आश्वासने देऊन वेळ मारून नेली जाते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाचे पक्के निघाले. लोकसभेच्या निवडणुकीत रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांना राजकीय पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते. विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करून त्यांनी तुमाने यांना सुखद धक्का दिला.

लोकसभेच्या निवडणुकीत रामटेकमधून दोन वेळा निवडून आणल्यानंतरही तुमाने यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. भाजपच्या आग्रहाखातर लोकसभेचे उमेदवार बदलल्या जात असल्याचा आरोपही केला जात होता.

रामटेकमध्ये काँग्रेसमधून आयात केलेल्या राजू पारवे यांना महायुतीने उमेदवार केले होते. या घडामोडींमुळे नाराज झालेल्या तुमाने यांची मुख्यमंत्र्यांनी समजूत काढली होती. तुमाने यांना विधान परिषदेत पाठवून राजकीय पुनर्वसन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. नागपूरमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यातसुद्धा शिंदे यांनी तुम्हाला पश्चाताप होणार नाही असेही जाहीरपणे सांगितले होते.

रामटेकमध्ये शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राजकारणात आश्वासन द्यावी लागतात, तडजोडी कराव्या लागतात. प्रसंग पाहून समजुती काढाव्या लागतात. त्यामुळे तुमाने यांना दिलेल्या शब्दावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. त्यांचे राजकारण संपले असेही जिल्ह्यात बोलले जात होते.

शिंदे सेनेने यवतमाळचाही उमेदवार बदलला होता. पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांना थांबवले. त्यांच्या ऐवजी हिंगोलीतून राजश्री पाटील यांना आयात करण्यात आले. त्यासुद्धा पराभूत झाल्या आहेत. रामटेक आणि यवतमाळमधील शिवसेनेचे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्याने तुमाने आणि गवळी यांची धाकधूक वाढली होती. दोघांचाही विषय संपला असेही बोलले जात होते. शिवसेनेकडे असलेल्या आमदारांच्या संख्याबळानुसार दोन सदस्य विधान परिषदेत जाऊ शकतात. दोन्ही जागा विदर्भाला देण्यात येईल यावरही कोणाचा विश्वास बसत नव्हता. मात्र मुख्यमंत्री शब्दावर ठाम राहिले. त्यांनी तुमाने आणि भावना गवळी यांना विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT