Devendra Fadnavis on Badlapur Minor Student Assault Sarkarnama
विदर्भ

Nagpur News: फडणवीस, राजीनामा द्या, बदलापूरच्या आरोपीला फाशी द्या! राऊत,वडेट्टीवारांची 'देवगिरी'वर धडक

Rajesh Charpe

Nagpur News: विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी नेते पुत्रांनी बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच अटकाव केल्याने त्यांनी बंगल्या समोरच्या रस्त्यावर घोषणाबाजी करून आंदोलन करावे लागले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत (Kunal Raut)आणि विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. कुणाल राऊत आणि शिवानी वडेट्टीवार हे दोन्ही युवा नेते विधासभेच्या निवडणुकीसाठी सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहे.

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात घुसखोरी करण्याचा प्रयत्न कुणाल राऊत यांचा आहे. अलीकडे त्यांच्या चंद्रपूरच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. चंद्रपूरने यापूर्वी नागपूरमधून गेलेले नाना श्यामकुळे यांना दोन वेळा निवडून दिले होते. मागील निवडणुकीत त्यांना अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी पराभूत केले होते. ही जागा रिकामी असल्याने कुणाल राऊत या ठिकाणी इच्छुक आहेत.

शिवानी वडेट्टीवार या चंद्रपूर लोकसभेसाठी उत्सुक होत्या. त्यांनी माध्यमांना भेटी देणेही सुरू केले होते. यावरून काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. प्रतिभा धानोरकर यांनी शिवानीच्या नावाला कडाडून विरोध दर्शवला होता. सोबत आपणच येथून लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्या निवडूणसुद्धा आल्या आहेत.

चंद्रपूर विधानसभा राखीव असल्याने शिवानी वेडट्टीवार काँग्रेसला पोषक अशा मतदारसंघाच्या शोधात आहेत. आता काँग्रेसने एकाच घरी दोघांना उमेदवारी दिली तर कुणाल राऊत आणि शिवानी वडेट्टीवार यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. विजय वडेट्टीवार विरोधीपक्षनेते आहेत. ते ब्रम्हपुरी मतदरसंघ सोडतील किंवा विश्रांती घेतील याची शक्यता नाही.

नितीन राऊत हे आपला उत्तर नागपूर मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीत. रामटेक लोकसभेसाठी नितीन राऊत आग्रही होते. मात्र माजी मंत्री केदारांनी आधीच बर्वे यांच्या नाव जाहीर केले होते. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देवगिरीसमोर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, बदलापूरच्या आरोपीला फाशी द्या अशी घोषणाबाजी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT