Narhari Zirwal Sarkarnama
विदर्भ

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना अन् दुष्काळावर भाष्य करताना मंत्री झिरवाळांची मोठी कबुली; म्हणाले, "सरकारला आर्थिक नियोजन..."

Narhari Zirwal on Ladki Bahin Yojana : "१९७२ मध्ये अन्नाचा दुष्काळ होता. मात्र, आज अन्नाची टंचाई नाही. परंतु, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यास रेल्वे किंवा विमानाने पाणी पोहोचवण्यासारख्या उपाययोजना कराव्या लागू शकतात. त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असेल," असे असे झिरवाळ यांनी म्हटलं आहे

Jagdish Patil

Nanded News, 22 Nov : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडत असल्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. मात्र, ही योजना सुरू ठेवताना आणि दुसरीकडे संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी निधीची तरतूद करताना सरकारची मोठी कसरत होत असल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विधानातून समोर आले आहे.

'धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय', अशा शब्दांत त्यांनी सरकारसमोरील पेच मांडला. त्यामुळे लाडकी बहीण योजनेवरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथे आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी नरहरी झिरवाळ उपस्थित होते.

यावेळी त्यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना सरकारसमोरील आव्हानांची कबुली दिली. लाडकी बहीण योजनेचा खर्च आणि संभाव्य दुष्काळामुळे निर्माण होणारी परिस्थिती या दोन्ही गोष्टींचा विचार करता सरकारला आर्थिक नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं.

यंदा पावसाची परिस्थिती आणि आगामी काळातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता सरकारला मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागू शकते, असे झिरवाळ यांनी सांगितले. १९७२ मध्ये अन्नाचा दुष्काळ होता. मात्र, आज अन्नाची टंचाई नाही. परंतु, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यास रेल्वे किंवा विमानाने पाणी पोहोचवण्यासारख्या उपाययोजना कराव्या लागू शकतात. त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यामुळे यंदा तसेच पुढील वर्षीही सरकारला काही प्रमाणात आर्थिक चणचण भासू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, संकटाच्या काळात सरकार कोणत्याही परिस्थितीत कमी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी दिला. दरम्यान, याच कार्यक्रमात नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानाचीही चर्चा सुरू आहे.

अजितदादा गेल्यापासून घड्याळ थोडं मागे-पुढे होतंय. अजितदादा असताना घड्याळ एक मिनिट मागे पुढे होत नव्हते आता घड्याळ थोड मागे पुढे होत असले तरी घड्याळ व्यवस्थित असल्याचे झिरवाळ यांनी म्हटलं. मात्र त्यांच्या या विधानाचा नेमका राजकीय अर्थ काय, याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT