

Satara News, 22 Nov : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून पुन्हा एकदा मंत्री शंभूराज देसाई आणि भाजप नेते तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील सुप्त संघर्ष उफाळून आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपासून सुरू झालेला दोन्ही नेत्यांमधील वाद आता जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून पुन्हा चर्चेत आला आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना अप्रत्यक्षपणे टोले लगावले जात असून, त्यांच्या वक्तव्यांमुळे साताऱ्यातील महायुतीमधील अंतर्गत संघर्ष समोर येत आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपासून साताऱ्यात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी हा वाद चांगलाच चिघळला होता. या निवड प्रक्रियेदरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांकडून धक्काबुक्कीही झाली होती. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील जखम भरून निघाल्याचे म्हणत देसाई यांनी नाव न घेता जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला होता.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतरही देसाई यांनी आपल्या विधानातून गोरेंना टोला लगावला. "काही जखमा वरून बऱ्या झाल्यासारख्या दिसतात. पण कदाचित ज्या खोलवर असतात, त्या लवकर बऱ्या होत नाहीत. त्यांना बरं होण्यासाठी थोडा उशीर लागतो. जालीम औषध घेतल्यावर त्या बऱ्या होतात," असे देसाई म्हणाले होते.
देसाई यांच्या या विधानाला जयकुमार गोरे यांनीही प्रत्युत्तर दिले. "जखमांवर जालीम औषध लावलं पाहिजे. पण कधी कधी अघोरी विद्येने त्या जखमेवर औषध देण्याचा प्रयत्न केला, तर ती जखम बरी होतेच असं नाही. किंबहुना त्याचे परिणाम आणखी गंभीर होतात. हे कधी कधी आपण समजून घेतलं पाहिजे," असे गोरे यांनी म्हटले होते.
आता गोरेंच्या या वक्तव्यावर शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. "हा अघोरी बाबा कुठे मिळतो, हे गोरे यांनाच विचारावे लागेल. त्यांना त्याचा इलाज लागू पडला असेल, तर मी त्यांच्याकडून माहिती घेईन," असा टोला देसाई यांनी लगावला. दरम्यान, 'दम होता तर निवडणूक एकट्याने लढवायची,' या जयकुमार गोरे यांच्या विधानावरही देसाई यांनी पलटवार केला. "आम्ही कधीही दमाची भाषा केली नाही. मात्र, कोणी वारंवार तसे बोलत असेल, तर आकडेवारी सर्व काही स्पष्ट करते. यावर जाहीर चर्चा करण्याची माझी तयारी आहे," असे देसाई यांनी म्हटले.
तालुक्यातील ११ पैकी ७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीने विजय मिळवला आहे. तसेच जिल्हा गटातील पाच जागांवरही हेच ठरावधारक मतदान करणार असल्याने आपली बाजू भक्कम असल्याचा दावा देसाई यांनी केला. दुसरीकडे, महायुतीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आल्याने सर्वच पक्ष आनंदित आहेत. जयकुमार गोरे हे मंत्रिमंडळातील आपले सहकारी असल्याने स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या विधानावर अधिक भाष्य करणार नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. एकूणच, जिल्हा परिषद निवडणुकीपासून सुरू झालेला शंभूराज देसाई आणि जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय संघर्ष जिल्हा बँकेच्या निवडीनंतरही कायम असल्याचे त्यांच्या परस्परविरोधी विधानांवरून दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.