Vikas Thakre and Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : नागपुरात गडकरी, ठाकरेंच्या विरोधात बसपा लावतेय जोर !

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित झाल्यानंतर बसपानेही नागपूर मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. आजवर बाहेरून उमेदवार घेऊन निवडणूक लढण्याकडे बसपाचा कल होता. तरीही बसपाला येथे यश मिळवता आले नाही. या वेळी योगेश लांजेवार यांना उमेदवारी देऊन बसपाने लढण्याची तयारी केली आहे.

या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या विरोधात बसपाने तेली समाजाचा उमेदवार देऊन लढतीत रंगत आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. बसपाच्या वतीने उमेदवाराच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये योगेश ऊर्फ योगिराज पतिराम लांजेवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बसपाचे खासदार रामजी गौतम, महाराष्ट्राचे प्रभारी नितीन सिंग, प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोणारे, प्रदेश महासचिव सुनील डोंगरे, प्रदेश सचिव दादाराव उइके, प्रदेश सचिव पृथ्वी शेंडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत रविभवन येथे बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर काही नावे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्याकडे पाठवण्यात आली होती. त्यामधून लांजेवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बसपाने यापूर्वी नितीन गडकरी यांच्या विरोधात नगरसेवक मोहम्मद जमाल आणि मोहन गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. त्यापूर्वी बनवारीलाल पुरोहित यांच्या विरोधात तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष बाबूराव वैद्य यांना उमेदवारी देण्यात आली होती. तत्पूर्वी बसपाच्या वतीने ज्वाला धोटे, नरेंद्र जिचकार यांची चाचपणी केली. शेवटी आपल्याच कॅडरला उमेदवारी द्यावी, असे ठरवण्यात आले होते.

आजवर बसपाच्या वतीने खुल्या मतदारसंघातून अनुसूचित जाती जमातीचा उमेदवार दिला जात नव्हता. याही वेळी तोच कित्ता गिरवण्यात आला आहे. बाहेरच्या उमेदवाराच्या माध्यमातून बसपाच्या वतीने आपल्या मतांचा टक्का वाढवण्याचा आधी प्रयत्न केला. मात्र, अलीकडे तो घसरत चालला असल्याचे दिसून येत आहे. कॅडर कार्यकर्ता आणि मतदारांचा पक्षावरचा विश्वास कायम ठेवण्यासाठी बसपा झगडत असल्याचे एकंदरीतच सुरू असलेल्या हालचालींवरून दिसते.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT