केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांच्या उत्तुंग कामगिरीमुळे त्यांचे नाव आज देशातील प्रत्येकाच्या तोंडी आहे. रोडकरी, पुलकरी म्हणून त्यांनी नाव कमावले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. दोन्ही वेळा त्यांना रस्ते वाहतूक हे खाते मिळाले आहे.
राज्यात असो वा केंद्रात, गडकरींना मिळालेले प्रत्येक खाते त्यांनी लोकप्रिय करून दाखवले आहे. मग ते जहाज बांधणी असो वा एमएसएमई. नागपूर लोकसभा मतदारसंघात (Nagpur Lok Sabha Constituency) गडकरी जातीय समीकरणात बसत नाहीत, पण तरीही ते दोन वेळा (2014, 2019) खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसा नागपूर हा कम्युनल मतदारसंघ नाही. त्यामुळे येथे यापूर्वी लोकनायक बापूजी अणे, जांबुवंतराव धोटे, बनवारीलाल पुरोहित, विलास मुत्तेमवार हे नेते निवडून आले आहेत. यामध्ये नितीन गडकरी एकदम फिट बसतात.
नितीन जयराम गडकरी
27 मे 1957
एम.कॉम., एलएलबी.
नितीन गडकरी यांच्या 'मातोश्रीं'चे नाव भानुताई आणि वडिलांचे नाव जयराम गडकरी आहे. पत्नी सौ. कांचन गडकरी यांचे माहेर नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे आहे. त्यांच्या माहेरचे आडनाव तोतडे आहे. कांचनताईंना दोन भाऊ आणि एक बहीण आहे. त्यांच्या माहेरच्या मंडळीचा राजकारणाशी दुरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. नितीन गडकरींना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मोठ्या मुलाचे नाव निखिल, छोट्याचे नाव सारंग आणि मुलीचे नाव केतकी आहे. तिघांचीही लग्नं झालेली आहेत.
शेती आणि उद्योजक. पूर्ती ग्रुपचे चेअरमन आहेत.
नागपूर
भारतीय जनता पक्ष
नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 1974-75 मध्ये विद्यार्थी चळवळीतून सामाजिक व राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हा त्यांचे वय 17-18 वर्षे होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चामध्ये ते सक्रिय होते. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाचे काम करू लागले. 1989, 1990, 1996 ला ते नागपूर पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 2002 मध्ये ते बिनविरोध निवडून आले. 27 मे 1995 ते 1999 या कालावधीत ते महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री राहिले. या काळात ते नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा होते.
महाराष्ट्रात 1995 ते 1999 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना त्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाच्या काळात महत्त्वाकांक्षी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्त्यांची उभारणी आणि व 50 ते 55 उड्डाणपुलांचे बांधकाम त्यांनी केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या हाय पॉवर कमिटी ऑफ प्रायव्हटायझेशन, रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष (2009 ते 2013) म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मराठी चेहरा असलेले ते दुसरे नेते ठरले. भाजपचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे होते. 16 व्या लोकसभेत नागपूर लोकसभा मतदारसंघातून 2,84,868 मतांच्या फरकाने गडकरी निवडून आलेले आहेत. त्यांना 5,87,767 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विलास मुत्तेमवार यांना 3,02,939 मते मिळाली होती. त्यानंतर 26 मे 2014 रोजी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
29 मे 2014 रोजी त्यांनी भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. 2019 च्या निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघात त्यांची लढत कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याशी झाली. या निवडणुकीत गडकरींनी पटोलेंना 2,16,000 मतांनी पराभूत केले. 2024 ची लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी केली आहे.
नितीन गडकरींनी खासगीकरणाचे नेहमीच समर्थन केले आहे. खासगी कंपन्यांकडून गुंतवणूक मिळविण्याच्या बाजूने ते नेहमीच राहिले, नव्हे तर तसा प्रचारही त्यांनी सातत्याने केला. व्यापारी संघटना, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, गुंतवणूकदार यांच्या बैठकांना त्यांनी संबोधित करून अनेक प्रकल्प खासगीकरणाकडे वळवले. याचे यश म्हणजे राज्य सरकारने ग्रामीण रस्ते जोडणीसाठी तब्बल 7 अब्ज रुपयांची तरतूद केली.
त्यानंतरच्या चार ते पाच वर्षांत रस्त्यांची जोडणी 98 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली. 13,736 गावांना जोडण्याचे काम करण्यात आले. या कामामुळे पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील दुर्गम असलेल्या मेळघाट-धारणी भागातील कुपोषण कमी करण्यास मदत झाली. नंतरच्या काळात केंद्र सरकारने त्यांची नियुक्ती राष्ट्रीय ग्रामीण रस्ते विकास समितीचे अध्यक्ष म्हणून केली. प्रदीर्घ अभ्यासानंतर त्यांनी केंद्र सरकारला अहवाल सादर केला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने त्यांचा अहवाल स्वीकारला आणि 600 अब्ज रुपये खर्चाची महत्त्वाकांक्षी ग्रामीण रस्ते जोडणारी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली.
या कामासाठी नितीन गडकरी यांना नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कै. माधवराव लिमये पुरस्कार बहाल करण्यात आला. गडकरी दरवर्षी नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजित करतात. यामध्ये पारंपरिक कला, संगीत, नृत्य आणि साहित्याचा समावेश असतो. देशातील विविध सांस्कृतिक कलांवर यामध्ये लक्ष केंद्रित केले जाते. यावेळी नागपुरात विविध सिनेकलावंत, क्रीडापटू, संगीतकार, साहित्यिक यांची मांदियाळी असते.
2019 मध्ये नितीन गडकरी यांनी लोकसभेची निवडणूक नागपूर लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा त्यांनी 2,16,000 मतांनी पराभव करत 2014 च्या विजयाची परंपरा कायम राखली.
2019 च्या निवडणुकीत गडकरींनी दणदणीत विजय मिळवला. याची काही कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. नागपूर लोकसभा मतदारसंघात गडकरींचे काम मोठे होते. काँग्रेस पक्षाकडे वेळेपर्यंत उमेदवार नव्हता. ऐनवेळी नाना पटोले यांना लढण्यास सांगण्यात आले. फार कमी दिवसांत पटोलेंनी तयारी केली. त्या तुलनेत त्यांनी बऱ्यापैकी मते मिळवली. पण यश मिळवू शकले नाहीत. गडकरींचे सर्व समुदायांशी जवळचे संबंध आहेत. जात, पात, धर्म, पंध, लिंग भेद त्यांनी कधीही पाळला नाही, हे त्यांच्या यशाचे गमक आहे.
आपल्या मतदारसंघात गडकरी नेहमी सक्रिय असतात. सामान्यपणे दर आठवड्यात शनिवारी आणि रविवारी ते मतदारसंघातच राहण्याचा प्रयत्न करतात. या काळात ते कार्यकर्त्यांच्या भेटी, जनता दरबार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवतात. सर्व समुदायांशी त्यांचा नियमित संपर्क असतो.
नितीन गडकरींचा प्रत्येक कार्यक्रम सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर प्रसारित होतो. त्याचा त्यांना मोठा लाभ होतो. त्यांची सोशल मीडियाची टीम स्ट्रॉंग आहे. दांडगा जनसंपर्क आणि त्यातही सातत्य राखणे हे गडकरींचे कौशल्य आहे.
नितीन गडकरी हे स्पष्ट, रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ‘ऐकत नसतील तर अधिकाऱ्यांना ठोकून काढा’, ‘मी काही ठेकेदाराकडून पैसे खात नाही, त्यामुळे काम ठोकून वाजवूनच घेत असतो’, ‘मी आपले काम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करतो, तुम्हाला मते द्यायची असतील तर द्या, नाही तर नका देऊ’, ‘मी साऱ्या देशभरात रस्ते बनवले, पण माझ्या घरासमोरचा रस्ता नाही बनवू शकलो...’अशी वक्तव्ये त्यांनी वेळोवेळी केली आहेत.
नितीन गडकरी यांचे राजकीय गुरू कोण, हे निश्चित सांगता येत नाही. ते स्वयंभू नेते आहेत.
नितीन गडकरी यांची लोकप्रियता देशभरात सातत्याने वाढलेली आहे. त्यांच्या कामाचा धडाका मोठा असतो. सर्व समुदायांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. मतदारसंघातीलच नव्हे तर देशभरातील जनतेचा विचार करून त्यांनी कामे केली आहेत. आजवर जे मंत्रालय त्यांना मिळाले, त्या मंत्रालयाची लोकप्रियता त्यांनी वाढवली आहे. नागपुरात त्यांना रोडकरी, पुलकरी आणि बब्बर शेर, असे संबोधले जाते. देशातील टॉप 5 परफॉर्मरमध्ये त्यांचा समावेश आहे.
नितीन गडकरी जातीय समीकरणात बसत नाहीत.
नितीन गडकरींना नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाही मिळाली तर काय, हा प्रश्नच मुळी भाजप कार्यकर्त्यांना पटत नाही. पण जरी असे झाले, तर ते पक्षाच्या विरोधात जाणार नाहीत. शेवटी राजकारण आहे, कधीही काहीही होऊ शकते. गडकरी कुणावरही नाराजी व्यक्त करणार नाहीत. ते अतिशय संयमी आहेत. पक्षाचा निर्णय मला मान्य आहे, असे म्हणून ते पक्षाचे काम करत राहतील.
(Edited By-Ganesh Thombare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.