Nana Patole and Jayshri Borkar Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार ठरेना, यंदा महिला असणार उमेदवार?

Nana Patole : महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसलाच मिळेल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठासून सांगितले आहे.

अभिजीत घोरमारे

Lok Sabha Election 2024 : लोकसभा 2024च्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेचे तिकीट मिळाल्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा महायुतीत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे गेली आहे. भंडारा-गोंदियातून विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांची दावेदारी समोर येऊ लागली आहे.

डॉ. फुके किंवा मेंढे दोघांपैकी एकाला भाजपचे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे तिकीट मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या खेम्यात अद्याप शांतता दिसत आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसलाच मिळेल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठासून सांगितले आहे. मात्र, भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसचा उमेदवार कोण, हे अद्याप गुलदस्तात आहे. लोकसभेच्या मैदानात उतरविण्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारच नाही की उमेदवाराच्या नावावर पक्षात एकमत नाही, अशी चर्चा यानिमित्ताने या दोन्ही जिल्ह्यांतील राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसला उमेदवार मिळेना की ठरेना, अशी कुजबूज सुरू झाली आहे. काँग्रेसकडून स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव चर्चेत येत आहे. असे असले तरी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर आणि काँग्रेसचे युवा नेते डॉक्टर प्रशांत पडोळे यांचे नाव काल-परवापासून समोर येऊ लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तिघांना वगळता काँग्रेसकडे भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांतून मतदान घेऊ शकेल, असे कोणतेही नेते अथवा कार्यकर्ते उपलब्ध नाहीत. इच्छुकांमध्ये जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, बंडू सावरबांधे यांचेही नाव अधूनमधून चर्चेत येत असते. असे असले तरी काँग्रेसला पहिल्या तिघांमधूनच उमेदवार ठरवावा लागणार आहे. आमदार नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष देत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा गृह जिल्हा असल्याने ही लोकसभा निवडणूक नानांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. नाना पटोलेंनी जर स्वतः या ठिकाणाहून निवडणूक लढवली नाही, तर त्यांना भाजपच्या तोडीचा उमेदवार देणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्याकडून अद्यापही लोकसभेच्या उमेदवाराबाबत निश्चित भाष्य केले जात नाही.

दुसरीकडे काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर यांचे नाव अधिक चर्चेत आहे. स्वतः कुणबी असल्याने जातीय समीकरणातही त्या फिट बसतात. दुसरीकडे नाना पटोलेंना भंडारा गोंदिया जिल्ह्याला महिला खासदार दिल्याचे क्रेडिटसुद्धा मिळेल. शिवाय यंदा महिला उमेदवार मिळाल्याने काँग्रेसलाही अधिक बळ मिळणार असल्याचा उल्लेख राजकीय जाणकार करीत आहेत. याशिवाय काँग्रेसच्या इतिहासात महिलेने राजकारणाचा नेहमी डंका वाजविला असल्याने काँग्रेस यंदा महिला उमेदवार देऊ शकते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीनंतर भंडारा-गोंदिया लोकसभेच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होईल, असे सूत्र सांगतात.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT