Lok Sabha Election Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : हलगर्जीपणावर मिळतंय तासभर लेक्चर, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशिक्षणांचा सपाटा !

अभिजीत घोरमारे

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदियात प्रशिक्षणाचा जणू सपाटाच लागला असून हलगर्जीपणा होऊ नये, म्हणून प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून तासभर लेक्चर दिले जात आहे. सतत ईव्हीएमबाबत विरोधकांचा विरोध लक्षात घेता ईव्हीएम वापराबाबत प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांवर योग्य ईव्हीएम हाताळण्यासाठी सूचनांचा भडिमार केला जात आहे.

आदर्श आचारसंहितेचे पालन कसे करावे, याचा डोस कर्मचाऱ्यांना नियमितपणे पाजला जात आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने प्रत्येक बाबींसाठी लिखित सूचना निर्गमित केल्या आहेत. विविध प्रशिक्षणांच्या माध्यमातून या सूचना देण्यात येणार आहेत, त्या नीट समजून घेऊन काम करणे अपेक्षित आहे. निवडणूक कार्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीची कामे व्यवस्थित व जबाबदारीने पार पाडावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी (निवडणूक) यांनी दिल्या आहेत.

निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून जिल्ह्यातील निवडणुकांशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येक विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीचे कामकाज करताना सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती अवगत करून त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी विधानसभा मतदारसंघांसाठी तयार करण्यात आलेले भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक, छायाचित्रीकरण पाहणी पथक व निवडणूक खर्च तपासणी पथक यांचे प्रशिक्षण संगणकीय सादरीकरणाद्वारे दिले जात आहे. सदर प्रशिक्षणास लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कामकाजात नियुक्त करण्यात आलेले विविध बँकेचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी एकजात उपस्थित राहू लागले आहे.

2024ची लोकसभा निवडणूक गोंदिया जिल्हा प्रशासनाने अधिक गंभीरतेने घेतली आहे. नव्याने आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तर बैठकीचा सपाटा लावलेला आहे. ईव्हीएम जागृतीसोबत मशीन हाताळण्यासाठी प्रशिक्षणांचा भडिमार केला जात आहे. साधी चूकही निवडणुकीच्या काळात खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच जिल्हाधिकारी बैठकांतून देत असताना पाहायला मिळतात. या सर्व धामधुमीत मात्र प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. निवडणूक आयोगामार्फत कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू केली जाऊ शकते. ही बाब लक्षात घेऊनच अख्खं गोंदिया जिल्हा प्रशासनच तयारीला लागले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT