Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा अधिकृतरीत्या होण्याच्या आधीच 'मोदी की गॅरंटी' या जाहिरातीने देशभरात प्रचाराचे वादळ घोंघावण्यास सुरुवात झाली होती. महाराष्ट्रात '४५ प्लस' अशी घोषणाही भाजप श्रेष्ठींनी केली आहे. अशात शिंदे सेनेच्या ताब्यात असलेला रामटेकचा गड पुन्हा जिंकण्याची 'गॅरंटी' मुख्यमंत्री शिंदे घेणार का, हा प्रश्नच आहे. कारण सध्या रामटेक लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे शिंदे सेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्यावर मतदार नाराज असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रामटेकच्या गडावर मतदारांची 'कृपा' कुणावर, या प्रश्नाचे उत्तर शोधून मतदारांच्या पसंतीस उतरणारा परिचित चेहरा आता भाजपला द्यावा लागणार आहे.
मागील काही दिवसात केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या चर्चा बैठकीत, जागा कुणाच्या ताब्यात आहे, यापेक्षा निवडून येणारा उमेदवार कुणाकडे आहे, या निकषावर जागा वाटप करण्याचे जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानुसार रामटेकची जागा ही सध्या शिंदे सेनेकडे असली तरी, विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्यावर मतदार नाराज असल्याची माहिती सर्वेतून उघड झाल्याचे सांगण्यात येते.
महत्वाची बाब म्हणजे नागपूर जिल्ह्यात सेनेचा खासदार असला तरी, प्रत्यक्षात मात्र ठाकरे सेना व शिंदे सेनेचा जिल्ह्यात सुपडा साफ आहे. नागपूर जिल्ह्यात सेनेच्या संघटनवाढीसाठी 'मातोश्री'वरून किंवा तुमाने यांच्याकडून मागील दहा वर्षांत कुठलेही प्रयत्न झाले नाही. सेनेच्या संघटनेचा किल्ला येथे ढासळला. याला काही अंशी भाजपचा वाढता 'ग्राफ' किंवा उपराजधानीतील भाजपच्या हेवीवेट नेत्यांचा अघोषित 'धाक'सुध्दा कारणीभूत ठरला. मात्र त्याचा फटका आता ठाकरे आणि शिंदे सेनेला बसतो आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सेनेचे व स्वत:चे ढासळलेले संघटन हेच कृपाल तुमानेंचा पराभव झाल्यास त्याचे कारण ठरणार आहे? राज्यातील हेवीवेट नेते असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागपूर हा गृहजिल्हा आहे. अशात लोकसभा निवडणुकीत गृहजिल्ह्यातील रामटेकमध्ये महायुतीचा पराभव भाजपच्या या हेवीवेट नेत्यांना जिव्हारी लागणार आहे. गृहजिल्ह्यातील रामटेकच्या पराभवाची मोठी किंमत भाजप प्रदेशाध्यक्षांना चुकवावी लागू शकते. तसा अनुभव यापूर्वी त्यांना आलेला आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही जागा भाजपच्या पदरात पाडून विजयश्री मिळवण्याचे मोठे आव्हान नेत्यांपुढे आहे.
रामटेकच्या गडाचा शिंदेंनाही आला अनुभव..
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिनाभरापूर्वी रामटेक येथे आले होते. येथे त्यांची जाहीरसभा झाली. ही सभा म्हणजे निवडणुकीपूर्वीचे शक्ती प्रदर्शनच होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जाहीरसभा असताना, त्यात किमान ५० हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षीत होती. मात्र गर्दीचा हा आकडा पाच हजाराच्या पार सरकला नाही. स्वपक्षाचा खासदार असताना रामटेकच्या गडावर आलेला हा अनुभव मुख्यमंत्री शिंदे यांना बरेच काही सांगून गेला आहे? त्यामुळे कृपाल तुमाने यांना पुन्हा एकदा मैदानात उतरविल्यास मतदार त्यांच्यावर मतांची 'कृपा' करणार का, याविषयी खुद्द: शिंदे सेनेच्या मनातही प्रश्नांची कालवाकालव सुरू आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.