Prataprao Jadhav
Prataprao Jadhav Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : प्रतापराव जाधवांना तिकीट मिळाल्यास काम करणार नाही, कुणी दिला इशारा ?

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती तयार झाली. पण या महायुतीमध्ये सर्वकाही ‘ऑलवेल’ नसल्याचे दिसत आहे. विशेष करून रामटेक, भंडारा-गोंदिया आणि बुलडाणा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांमधील ‘ट्युनिंग’ काही केल्या जुळताना दिसत नाही. बुलडाण्यात आमच्या पदाधिकाऱ्यांना मान दिला नाही म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचे काम करणार नसल्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्षांमधील प्रमुख राजकीय पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात होणारी लोकसभेची निवडणूक ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. लोकसभेच्या 48 जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती अशी मोठी लढत पाहायला मिळणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात महायुतीत सध्या गटबाजीला उधाण आलेले आहे. आमच्या नेत्यांना मान दिला जात नाही म्हणून बुलडाणा लोकसभेसाठी खासदार प्रतापराव जाधव यांना तिकीट मिळाल्यास आम्ही त्यांचा काम करणार नाही, असा थेट इशारा भाजप पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीच्या घटक पक्षांची बैठक व मेळावा आयोजित करण्यात आला. मात्र, या मेळाव्यात बुलडाणा जिल्ह्यातील भाजपच्या आमदार श्वेता महाले आणि ॲड. आकाश फुंडकर यांना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून भाजप जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेची उमेदवारी खासदार प्रतापराव जाधव यांना दिल्यास पक्षाचे काम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या नात्याने आम्ही करणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अर्जुनराव वानखेडे म्हणाले की, आतापर्यंत भाजपच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला कार्यक्रमासाठी शिंदे गटाने बोलावले नाही. त्यांनी जाणीवपूर्वक श्वेता पाटील, ॲड. आकाश फुंडकर यांचे फोटो डावलले आहेत. गटातटाचे राजकारण केल्याशिवाय यांचे पोट भरत नाही. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव हे द्वेष भावनेने राजकारण करतात. त्यांनी आज (ता. 22) मेहकर येथे महायुतीची बैठक बोलावली होती. मात्र, यात आमच्या नेत्यांना डावलण्यात आले. आता त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून कुठलीच अपेक्षा करू नये. आम्ही त्यांना कुठलेही सहकार्य करणार नाही. भाजप संपवण्याचे काम या लोकांनी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपकडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार का, असे त्यांना वानखेडे यांना विचारले असता ते म्हणाले की, कमळ चिन्ह त्यांना मिळण्याचा काही प्रश्नच येत नाही.

या सर्व प्रकाराबाबत वरिष्ठ स्तरावर अहवाल मी स्वतः पाठविला असल्याचेही वानखेडे त्यांनी या वेळी सांगितले आहे. यामुळे प्रतापराव जाधव यांना स्वतःच्याच विधानसभा मतदारसंघातून घरचा आहेर मिळाला आहे. भाजप पदाधिकारी जर काम करणार नसतील तर बुलडाणा मतदारसंघात भाजप दुसरा उमेदवार देणार का आणि प्रतापगड अभेद्य राहणार की भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी प्रतापराव जाधव दूर करणार, हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, अशा प्रकारे भाजप जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT