Sudhir Mungantiwar, Dr. Ashok Jivtode and Hansaraj Ahir Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : चंद्रपूरमध्ये कोण असणार भाजपचा उमेदवार? उत्सुकता शिगेला !

Dr. Ashok Jivtode : ओबीसी नेते अशोक जिवतोडे यांच्या नावाचीही लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा सुरू झाली आहे.

संदीप रायपूरे

Lok Sabha Election 2024 : राज्यातील शेवटच्या टोकावर असलेले चंद्रपूर लोकसभा क्षेत्र हल्ली चांगलेच चर्चेत आले आहे. त्याला कारणही तसेच आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचं पानिपत झालं. पण चंद्रपूर लोकसभेने काँग्रेसची लाज राखली गेली. भाजपचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी पराभव केला. या पराभवाचे शल्य हंसराज अहीर यांना आजही आहे. भाजपला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला.

यंदा भाजपने देशात चारसौ पार चा नारा दिला आहे. दस्तुरखुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत दिलेल्या भाषणातून याबाबतची गॅरंटी दिली. त्यामुळे देशभरातील एक-एका जागेवर विजय मिळविण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढताना चंद्रपूर लोकसभेची जागा आपणास परत कशी मिळविता येईल, यासाठीची तयारी फार दिवसांपूर्वीच सुरू झालीय.

लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूरातून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची नावे आघाडीवर आहेत. पण भाजप आता तिस-या पर्यायाचा विचार करीत आहे की काय, अशी स्थिती दिसते आहे. भाजपला लोकसभेसाठी प्रबळ ओबीसी चेहरा हवा आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच राजु-याचे भाजपचे माजी आमदार संजय धोटे यांना लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात पक्षाकडून विचारणा झाली होती. अशात आता पक्ष नेमकी कुणाला उमेदवारी देणार, याकडे मतदारसंघातील लक्ष लागले आहे.

दरम्यान याबाबत भाजप नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आमचा उमेदवार म्हणजे कमळ हेच चिन्ह आहे, असे सांगितले. यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय यांनी भाजप या निवडणुकीत धक्कातंत्राचा वापर करू शकते, अस म्हटलं आहे. नुकत्याच पाच राज्याच्या निवडणुकांत भाजपने खासदारांना आमदारकीच्या निवडणुकीत उतरविले होते. आता राज्यात कॅबिनेट मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांना भाजप उमेदवारी देऊ शकते.

हंसराज अहीर यांना ज्या दिवशी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले, त्याचवेळी त्यांची लोकसभेची उमेदवारी जवळपास बाद झाली होती, असेही सांगण्यात येते. ओबीसी नेते अशोक जिवतोडे यांच्या नावाचीही लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा सुरू झाली आहे. अशोक जिवतोडे यांनी यासाठी फिल्डिंग लावली आहे. गेल्या काळात त्यांनी ओबीसींच्या न्यायहक्कासाठी विविध उपक्रम राबविले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. चंद्रपुरातील लोकसभेची जागा कुठल्याही स्थितीत जिंकण्यासाठी भाजप आर या पार ची तयारी करत आहे. यासाठी स्वच्छ प्रतिमेच्या ओबीसी चेह-याची शोधाशोध सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता लोकसभा मतदारसंघाचा भाजपचा उमेदवार कोण असेल, याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT