Uddhav Thackeray, Nana Patole, Sharad Pawar, Ajit Pawar, Eknath Shinde and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : जातीय समीकरणात जो ठरेल वरचढ, तोच लढणार यवतमाळ-वाशीम लोकसभा !

Yavatmal - Washim Constituency : महायुती नव्या चेहऱ्याच्या शोधात, तर महाविकासमध्ये इच्छुकांची गर्दी !

सतीश हरिश्चंद्र येटरे

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला प्रशासन लागले आहे. त्यातच राजकीय पक्षही मेळावे, सभा घेऊन पदाधिकाऱ्यांना ‘चार्ज’ केले जात आहे. महायुतीचे नेते नवीन चेहऱ्याचा शोध घेत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. मात्र, मतदारांना अपील होईल, अशा सर्वसमावेशक चेहऱ्याचा अभाव आहे. जातीय समीकरणात कोण वरचढ ठरू शकतो, यावरदेखील महाविकास आघाडीचा फोकस आहे.

यवतमाळ-वाशीम मतदारसंघावर 1999पासून शिवसेनेचे प्राबल्य आहे. राजकीय उलथापालथीत विद्यमान खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पसंती दिली. तरीदेखील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट मतदारसंघावरील आपला दावा सोडायला तयार नाही. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील कोणता पक्ष लढणार, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे.

मतदारसंघावर शिवसेना (ठाकरे) गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी आपला दावा कायम ठेवून आहेत. वेळ पडल्यास उमेदवारीचा मुद्दा दिल्ली दरबारी रेटण्यात येणार आहे. आठवडाभरापूर्वी काँग्रेस पक्षाने इच्छुकांचे अर्जही मागविले. त्यात उमेदवारीसाठी दावा करणाऱ्यांची गर्दी झाली.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघावर तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून दावेदारी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी पदाधिकाऱ्यांची मने दुभंगली जात आहे. शिवसेनेचा उमेदवार सातत्याने निवडून आल्याने त्यांच्याकडून दावा केला गेला आहे. मात्र, आता शिवसेना (ठाकरे) गटाच्या ताकदीत विभागणी झाल्याची टिप्पणी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडून केली जात आहे.

शिवसेनेकडे सक्षम उमेदवार आहेत, त्यात माजी मंत्री, माजी आमदार, पदाधिकारी उमेदवारीसाठी दावा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे पदाधिकारीही दावा करण्यात मागे नाहीत. निवडणुकीच्या तयारीत प्रशासन व्यस्त होत असताना महाविकास आघाडीत मतदारांना भावेल, असा सर्वसमावेशक चेहरा अद्याप समोर आला नाही. त्यामुळे उमेदवारीची माळ कुणाच्या पदरात पडणार, हे एक कोडेच आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चर्चा एकाच मतदारसंघाची..

यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर-आर्णी आणि हिंगोली-उमरखेड या तीन मतदारसंघांमुळे जिल्ह्याला तीन खासदार लाभले. त्यांपैकी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले. जिल्ह्याशी तीन मतदारसंघांची नाळ जुळली असताना महाविकास आघाडी असो अथवा महायुती यांच्यात केवळ यवतमाळ-वाशीमवर दावे-प्रतिदाव्यांचे घमासान होताना इतर दोन मतदारसंघांबाबत सध्यातरी काही चर्चा नाही.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT