Sunil Kedar Sharad Pawar uddhav Thackeray  sarkarnama
विदर्भ

Sunil Kedar : नागपूर जिल्ह्यातील ठाकरे, पवारांचे उमेदवार सुनील केदार ठरवणार? स्थानिक नेते धास्तावले

Rajesh Charpe

Sunil Kedar News: माजी मंत्री आणि सावनेरचे आमदार सुनील केदार यांनी लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला रामेटक जिंकून दिले होते. तेव्हापासून नागपूर जिल्ह्यात त्यांचा चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. मात्र त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे मित्रपक्षांची डोकेदुखी वाढली आहे. विशेषतः शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेनेच्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची अदलाबदली करण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत सुरू असल्याने अनेकांनी धास्ती घेतली आहे.

केदार यांना दबंग नेता म्हणून ओळखले जाते. त्यांना सावनेर विधानसभा मतदारसंघातून पराभूत करण्याचे आजवर भाजपचे सर्वच प्रयत्न अपयशी ठरले. कुणाचाच दबाव ते खपवून घेत नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे नेतेही त्यांच्यापासून अंतर राखून असतात. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी एकमेव रश्मी बर्वे यांच्या नावाचा ठराव केंद्राकडे पाठवला होता. त्यांच्या विजयाची हमीसुद्धा घेतली होती. केदारांमुळे बर्वे यांच्या नावाला विरोध करण्याची कोणी हिंमत दाखवली नाही.

संपूर्ण रामटेक लोकसभा मतदारसंघ केदारांवर सोपवण्यात आला होता. रामटेकमध्ये महायुतीच्या पराभवाची वेगवेगळी कारणे आहेत. संविधानापासून तर महागाईचा फटका भाजपला बसला. विदर्भात नागपूरचा वगळता भाजपचे सर्वच उमेवार पराभूत झाले आहेत. मात्र रामटेकमध्ये विजयाचे श्रेय फक्त केदारांनाच दिले जात आहे. आज घडीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे घट्ट संबंध निर्माण झाले आहेत.

आता नागपूर जिल्ह्यात विधानसभेचे उमेदवार निवडताना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना केदारांचा सल्ला घेतात. हीच बाबा अनेकांना खटकत आहे. ते आपल्या समर्थकांनाच समोर करीत असल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

स्थानिक नेते केदारांवर नाराज?

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघ शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. मात्र या जिल्ह्यावर केदारांनी दावा केला आहे. राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या नावलाही त्यांनी विरोध दर्शवला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीने सोडला नाही तर ते आपल्या समर्थकाला राष्ट्रवादीत पाठवून उमेदवार करतील, अशी भीती अनेकांना सतावत आहे. जे हिंगण्यात सुरू आहे तेच रामटेक आणि कामठी विधानसभेतही सुरू आहे. रामटेक शिवसेना सोडणार नाही हे ठरले आहे. मात्र येथील उमेदवार शिवसेना ठरवेल की केदार याची कोणाला शाश्वती नाही.

कामठीसाठीसुद्धा त्यांनी अनेक इच्छुकांना तयार करून ठेवले आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरडेमध्ये केदार समर्थकांनी पोस्टर, बॅनर लाऊन प्रचार सुरू केला आहे. यापैकी बहुतांश उमरेड विधानसभा मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत. यावरून केदारांमुळे शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील स्थानिक नेंत्यांसह आणि काँग्रेसच्याही स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT