Devendra Fadanavis Sarkarnama
विदर्भ

Tuljabhavani Temple Fraud: तुळजाभवानी देवीच्या दागिने भेसळीचा तपास करणार; फडणवीसांची ग्वाही

Maharashtra Assembly session 2023: जानकर यांच्या निवेदनावर देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

संपत देवगिरे- सरकारनामा ब्युरो

Nagpur News: महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजापुर देवस्थानामध्ये प्राचीन दागिन्यांमध्ये घोटाळा झाला आहे. त्यातील देवीचा एक प्राचीन मुकूट गहाळ झालेला आहे. दागिन्यांमध्ये भेसळ असल्याचे समोर आले आहे. याबाबत तातडीने पोलिसांत गुन्हा दाखल करून तपास करण्यात येईल, अशी घोषणा मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशात या विषयावर चर्चा झाली. विधानपरिषदेमध्ये प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर हा महत्ताचा विषय असल्याने यावर निवेदन करण्यास सभापती नीलम गोऱ्हे यांनी परवानगी दिली होती. याबाबत महादेव जानकर यांनी निवेदन केले. ते म्हणाले, तुळजापुरच्या भवानी मातेचा एक प्राचीन मुकूट गहाळ झालेला आहे. एक किलो वजनाचा हा प्राचीन मुकूट आहे. तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट संस्थेच्या तिजोरीत असलेल्या दागिन्यांमध्ये देखील मोठी तफावत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तिजोरीतून हिरे, मोती, माणिक, पाचू देखील गहाळ झालेले आहेत. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झालेले नसल्याने त्याचा तपास झालेला नाही. सरकारने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी मध्येच हस्तक्षेप करीत, याची चौकशी झाली असून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना मिळाला असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार करण्याची तयारी दाखवली आहे.

मंदिर संस्थानच्या ताब्यात असलेल्या दागिन्यांचे वजन वाढलेले आढळल्याने यामध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे गृहमंत्र्यांनी याबाबत निर्णय करावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. यावर खुलासा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा गंभीर विषय आहे. शासनाने त्याची योग्य दखल घेतली आहे. आमच्याकडे सभापतींचे पत्र देखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे तातडीने पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले जातील. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले.

काय आहे प्रकरण..

तुळजाभवानी मंदिरामध्ये दरवर्षी काही लाखो भक्त दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सवामध्ये तर तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी उसळते. आपली इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी भक्त नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यानंतर सोने-चांदीचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले जातात. देवीला मिळालेल्या दागिन्यांची नोंदणी देवस्थान संस्थानकडून केली जाते. समोर आलेल्या माहितीनुसार २७ अलंकारापैकी ४ अलंकार गायब झाले आहेत. तर काही दागिन्यांचे वजन देखील वाढले आहे.

Edited By : Chaitanya Machale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT