Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Assembly Winter Session : पोलीस भरतीवर फडणवीसांनी दिली मोठी अपडेट; NCRBच्या आकडेवारीवरून विरोधकांना सुनावले

Anand Surwase

Nagpur Assembly Session 2023 : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्रातील गुन्हेगारीच्या आकडेवारी वरून राज्याची बदनामी केली जात आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात महिला अत्याचार, अपहरण, खून या सारख्या घटना होत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच ड्रग्ज प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यावर आज गृहमंत्री फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले. एनसीआरबीची आकडेवारी ही लोकसंख्येच्या आधारावर दिली जाते. मात्र, माध्यमांमधून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले जात असले तरी महाराष्ट्र महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य असल्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज्यात बेपत्ता मुली, महिला, मुले या घटना केवळ आमच्याच सरकारमध्ये घडल्या नाहीत. गेल्या वर्षी राज्यात 4000 मुली आणि 64000 महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण आहे. पण त्या प्रकरणात त्या बेपत्ता झालेल्या मुली या परत येण्याचेही प्रमाणही तितकेच आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही इतक्याच मुली आणि महिला बेपत्ता झाल्या होत्या. मात्र या बेपत्ता मुली परत येण्याचे प्रमाण 90 टक्के तर महिलांचे प्रमाण 40 टक्के आहे. पण यावरून महाराष्ट्र हा गुन्हेगारीत अव्वल असल्याचे सांगितले जाते. मात्र एनसीआरबीच्या आकडेवारीत दिलेली गुन्ह्यांची संख्या प्रति लाख लोकसंख्येचा प्रमाणात असल्याचे फडणवीस म्हणाले.

2020 च्या तुलनेत महाराष्ट्रातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. महाराष्ट्र हा गुन्ह्यात पहिल्या पाच राज्यांत नसून दिल्ली हरयाणा, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान यानंतर महाराष्ट्र असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्ह्यांच्या आकडेवारीच्या नावाने महाराष्ट्राला बदनाम केले जाते. मुंबईत मध्य रात्री 12 वाजता एखादी महिला फिरत असेल तर तिला सुरक्षीत वाटते. पण ती परिस्थिती दिल्लीत नाही. त्यामुळे आकडेवारीच्या आधारावर महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. मात्र येणाऱ्या काळात सायबर गुन्हे यासंदर्भात लक्ष देणे गरजेचे असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

खुनाच्या संख्येत प्रतिलोकसंख्येनुसार महाराष्ट्र 20 व्या क्रमांकावर आहे. खुनाचा प्रयत्न 16 व्या क्रमांकावर आहे. याच बरोबर महिलांवर हल्ले यात लोकसंख्येच्या आधारावर पाहिले ओडिशा राजस्थान, केरळ, कर्नाटक, उत्तराखंड या सगळ्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मागेच आहे. एक जरी बलात्कार झाला तर ती गोष्ट लाजीरवाणी आहे. बलात्कार होतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे, याचे समर्थन करता येत नाही. मात्र यात महाराष्ट्र 16 व्या क्रमांकावर आहे. अपहरणाच्या केसेसमध्येही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर नाही. बिहार पेक्षा जास्त अपहरण महाराष्ट्रात होते हे खरे नाही. अनेक वेळा माध्यमांमध्ये महाराष्ट्र महिलांकरता सुरक्षित नसल्याचे सांगितले जाते. मात्र ही वस्तुस्थिती नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र हे सर्वात सुरक्षित राज्य असल्याचेही फडणवीस यांनी एनसीआरबीच्या अहवालावर उत्तर देताना म्हटले. तसेच महिलांवर होणारे अत्याचार यासाठी आपण 27 विशेष न्यायालये, 86 फास्ट ट्रॅक न्यायालये, स्थापन केली आहेत. राज्यातील दंगली संदर्भात दिलेले आकडे जातीय अथवा जमावाने केलेल्या दंगलीचे नसल्याचेही फडणवीस म्हणाले. तसेच 2020 च्या तुलनेत 2022 मध्ये दंगलीच्या संख्येत घट झाल्याचेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'नागपूरला बदनाम करणे थांबवा'

मी मुख्यमंत्री झाल्यापासून नागपुरात काही नेत्यांकडून काही भडकावू वक्तव्ये केली जातात. तीन पोलीस स्टेशनमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत गुन्ह्यांची संख्या ग्राह्य धरली जाते. मात्र लोकसंख्येचे प्रमाण वाढलेले असून गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे विनाकारण नागपूरला क्राईम सिटी अशी बदनामी करून या ठिकाणी येणाऱ्या गुंतवणुकीला खोडा घालण्याचे काम बंद करावे, असा इशारा त्यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना यावेळी दिला.

'ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई'

नाना पटोले यांनी अमली पदार्थप्रकरणावर प्रश्न उपस्थित केला. आमचे सरकार आल्यानंतर 24000 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. वेगवेगळ्या राज्यांना ड्रग्जची कारवाई करण्यची गरज आहे. यासाठी केंद्राने एक बैठक घेतली होती. त्यानुसार वेगवेगळी राज्ये ड्रग्ज कारवाई संदर्भात माहिती देत आहेत. त्यानुसार मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याचेही ते बोलले. मुंबई पोलिसांनी 4000 किलो ड्रग्ज जप्त केले आणि ते नष्ट करण्याची कारवाई केली आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी ड्रग्जच्या कारखान्यावर मुद्दा उपस्थित केला. ही वस्तुस्थिती आहे की ड्रग्जचे कारखाने सुरू होत आहेत. ललित पाटीलने 2020 मध्ये कारखाना उघडला होता. पण या प्रकणात कोणी कोणी मदत केली याची माहिती देखील आमच्याकडे असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. तसेच ड्रग्ज विरोधी कारवाईसाठी जो अधिकारी कर्मचारी अधिकारी दोषी आढळून येईल, त्याला आपण डिसमीस करणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पोलीस भरतीवर फडणवीस म्हणाले...

2023 च्या आकृतीबंधानुसार पोलीस दलामध्ये बदल होणार आहेत. दोन पोलीस स्टेशनमध्ये अंतर, पोलीस स्टेशनमध्ये किती युनिट कार्यरत असतील, तसेच एका युनिटमध्ये किती पोलीस असले पाहिजे, असा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. तसेच स्ट्रीट क्राईम पेक्षा सायबर गुन्हेगारी वाढली आहे. त्यानुसार नवा आकृतीबंध तयार करण्यात आला असल्याचेही फडणवीस म्हणाले.

23 हजार पोलीस पदे भरली जाणार आहेत आणि ही अभूतपूर्व भरती आहे, हा भरतीचा रेकॉर्ड आहे. तसेच भरती होऊन येणाऱ्या मुलांच्या प्रशिक्षणासाठी आपण नवीन यंत्रणा तयार केली आहे. राज्यात 187 नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली असून नागपूर विभागात सर्वाधिक 47 पोलीस ठाण्यांची मंजुरी दिली आहे. पोलिसांच्या पुढील वर्षीच्या भरतीसाठी देखील तयारी सुरू आहे. भरती झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळ द्यावा लागत आहे. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी पोलिसांना 8 तासांची ड्युटी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT