Dilip Walse Patil, Gunaratna Sadavarte  Sarkarnama
विदर्भ

Gunaratna Sadavarte ST Bank : विधिमंडळात भडका, सदावर्तेंवर गंभीर आरोप; राज्य सरकारची मोठी कबुली

Maharashtra Assembly Winter session : गुणरत्न सदावर्तेंमुळे एसटी बँकेत अनियमितता....

Anand Surwase

Maharashtra Assembly Winter Session 2023 : एसटी कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेवर गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने एक हाती सत्ता मिळवत मातब्बर राजकारण्यांना झटका दिला होता. आता सदावर्तें यांच्या पॅनलने बँकेचा कारभार हाती घेताच बँकेच्या सभासदांनी तब्बल 180 कोटी रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे सदावर्ते यांनी 23 वर्षांच्या मेहुण्याला बँकेचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केल्यानंतर हा आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार घडला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि सचिन अहिर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यानंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आर्थिक गैरव्यवहाराची कबुली दिली आहे.

एसटी को ऑपरेटिव्ह बँकेवर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलची सत्ता आल्यानंतर बँकेच्या कारभारावर संचालक मंडळाकडून अनियमिततेचे आरोप करण्यात आले आहेत. सदावर्तेंच्या मनमानी कारभारामुळे बँकेच्या सभासदांनी आपल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या या मनमानी कारभाराला वैतागून व्यवस्थापिक संचालकाने राजीनामा देताच सदावर्ते यांनी आपल्या 23 वर्षीय मेहुण्याला व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केल्याचाही आरोप काही संचालकांनी केला. एकंदरीत बँक अडचणीत येण्याची चिन्हे असल्याने ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि सचिन अहिर यांनी सोमवारी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.

एसटी कर्मचारी बँकेसंदर्भात झालेल्या अनियमितते प्रकरणी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले. बँकेच्या सभासदांनी 180 कोटी रुपये काढून घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच बँकेच्या संचालक मंडळाने 9 ते 14 टक्के असलेल्या व्याजदरात घट करत तो 7 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कर्ज वाटपातही अनियमितता दिसून आल्याने बँकेच्या सभासदांनी पैसे काढून घेतले असल्याचेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

23 वर्षांचा मेहुणा व्यवस्थापकीय संचालक

एसटी कर्मचारी सहकारी बँकेवर सत्ता येताच सदावर्ते यांनी आपला मनमानी कारभार सुरू केल्याचा आरोप नुकताच काही संचालकांनी केला. तसेच पूर्वीच्या बँक व्यवस्थापकाने राजीनामा देताच त्या जागेवर सदावर्तें यांनी आपल्या 23 वर्षीय मेहुण्यााला थेट व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले होते. त्याला बँकींग क्षेत्रातील कोणताही अनुभव नाही. त्यासाठीचे निकष पूर्ण होत नसताना सदावर्तेंनी मेहुण्याला नियमबाह्यपणे पदावर कसे बसवले? असा सवाल शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

तसेच या संदर्भात कारवाई करण्याची मागणीही आमदार पाटील यांनी केली. सदावर्तेंनी केलेल्या अनियमितते संदर्भात सध्या चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर झालेल्या अनियमितता दुरुस्त केल्या जातील, असे आश्वासन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिले आहे.

(Edited By Sachin Fulpagare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT