Nawab Malik and Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Nagpur Winter Session: 'लेटर बॉम्ब'नंतर फडणवीस अन् मलिक पहिल्यांदाच आमने-सामने; पण...

Pradeep Pendhare

Nagpur News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्याविषयी भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "लेटर बॉम्ब" फोडल्यानंतर आज दिवसभर नागपूर हिवाळी अधिवेशनावर त्याचे पडसाद राहिले. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार मलिक यांनी विधान भवन परिसरात एकमेकांना केलेले अभिवादन हे सूचक असल्याची चर्चा रंगली आहे.

नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना सत्तेत सहभागी करून घेणे उचित ठरणार नाही, असे पत्र भाजप नेते उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिले होते. यावरून आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पडसाद उमटले.

या घमासानानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि नवाब मलिक या दोघांनीही मौन बाळगले. दरम्यान, आमदार मलिक यांनी "मी वैद्यकीय जामिनावर असल्यामुळे मला न्यायालयाने कोणतीही राजकीय भूमिका जाहीरपणे माध्यमांसमोर मांडण्यास मनाई केली आहे", अशी प्रतिक्रिया "सरकारनामा"शी बोलताना दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवाब मलिक आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधानसभेच्या कामकाजात सहभागी झाले. सत्ताधारी अजित पवार गटाच्या बाकांवर जाऊन बसले. अधिवेशनात सहभाग नोंदवल्यानंतर आमदार मलिक हे विधान भवन परिसरामध्ये फिरत होते. विधान भवन परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनातही ते जाऊन आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयातही जाऊन बसले होते.

अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे असलेल्या आमदारांच्याही त्यांनी गाठीभेटी घेतल्या. पण या गाठीभेटी धावत्या आणि ओझरत्या होत्या. शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्याशीदेखील त्यांचा काहीसा संवाद झाला. यानंतर विधान भवन परिसरात उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार नवाब मलिक हे दोघेजण एकमेकांसमोरून क्रॉस झाले.

या वेळी फडणवीस यांनी समोरून येत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) यांना हात जोडले. नवाब मलिक यांनीदेखील त्याला प्रतिसाद देत हात जोडले. एकमेकांकडे पाहून हसून प्रतिसाद देत पुढे निघून गेले. फडणवीस आणि मलिकांमध्ये झालेला हा अप्रत्यक्षपणे संवाद होता, असे काही जाणकारांचे म्हणणे आता समोर येत आहे.

या अभिवादनापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील नवाब मलिकांबाबत सूचक वक्तव्य केले. देशद्रोहाचे निर्दोषत्व झाल्यास ते महायुती सरकारमध्ये दिसतील, असे बावनकुळे यांनी म्हटले.

यातच काँग्रेस (congress) विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीदेखील नवाब मलिक यांच्याबाबतची महायुती सरकार घेत असलेली भूमिका ही मिलीभगत आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. यामुळे नवाब मलिक यांच्याबाबत महायुती सरकार सकारात्मक असल्याची चर्चा आता जोर पकडू लागली आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT