Winter Session 2023 : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी डिसेंबर महिन्यात उपराजधानी नागपूर येथे होते. यंदाही अधिवेशनाचे कामकाज गुरुवारपासून सुरू होत आहे, पण यंदाचे अधिवेशन पुन्हा एकदा हिवाळी की पावसाळी असा प्रश्न विधिमंडळातील मंत्री, आमदार यांच्यासह सर्वसामान्य नागपूरकरांनाही पडला आहे.
अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार असल्याने नियोजित वेळापत्रकानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ बुधवारी सायंकाळी उपराजधानीत दाखल झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नागपुरात आलेल्या या सर्व मंत्र्यांचे अवकाळी पावसाच्या सरींनी जोरदार स्वागत केले. बुधवारी पहाटे पाचपासूनच विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने ओलं केलं. बुधवारी दिवसभर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या.
एकीकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या तोंडून निघणाऱ्या आरोपांच्या ज्वाला चांगल्याच भडकल्या होत्या. परंतु पावसाची सततची रिपरिप सुरू राहिल्याने हा पाऊसही त्यावर भारी पडल्याचे दिसून आले. बुधवारी दिवसभरात अनेकदा पावसाने जोर धरला. त्यामुळे अधिवेशनाच्या प्रत्यक्ष कामकाजाचा पहिला दिवस पावसामुळे भिजवणारा ठरतो की काय, अशी चर्चा होती.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण विदर्भातून विविध पक्षाचे नेते व कार्यकर्ते बुधवारी दुपारपासून नागपुरात दाखल झाले आहेत. आपापल्या नेत्यांना भेटण्यासाठी ही मंडळी नागपुरात तळ ठोकून राहणार आहे.
विदर्भव्यतिरिक्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि उर्वरित महाराष्ट्रातील काही कार्यकर्ते नागपुरात मुक्कामी राहणार आहेत. या सर्व कार्यकर्त्यांनाही बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने चांगलेच भिजवले.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जुलै 2018 मध्ये नागपुरात घेण्यात आले होते. त्यावेळी अतिवृष्टीने नागपूर शहराला जबर तडाखा दिला होता. नागपुरातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती, तर विधान भवनाच्या परिसरातही पावसाचं पाणी शिरलं होतं. तेव्हाचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या उपस्थितीत विधान भवनातील हे पाणी बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती.
धक्कादायक म्हणजे एकीकडे विधान भवनात हे काम सुरू असताना, दुसरीकडे अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच आढळला होता. या रिकाम्या दारूच्या बाटल्या विधान भवनातील ड्रेनेजमध्ये अडकून पडल्या होत्या. त्यामुळे विधान भवनातील सांडपाण्याचा निचरा होत नव्हता. परिणामी परिसरात पावसाचं पाणी शिरलं होतं. विधान भवन परिसरात बंदोबस्त असतानाही या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या कशा आल्या?, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता.
आता नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोर धरला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार आणखी काही दिवस हा अवकाळी पाऊस कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस विधान भवनातील कोणतं पितळ उघडं पडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.