चेतन देशमुख
Yavtmal News : यवतमाळ-वाशीम स्थानिक स्वराज्य संस्थेचा इतिहास पहिला तर याठिकाणी विधान परिषद निवडणुकीत मोठी आर्थिक उलाढाल होते. या ठिकाणी निवडणूक काळात मोठा घोडेबाजार पहावयास मिळतो. निवडणुकीची घोषणा होऊन आठ दिवसापेक्षा अधिककाळ झाला असताना महाविकास आघाडी अद्याप निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसत नाही. या निवडणुकीसाठी महायुतीचे वाढलेले मोठे संख्याबळ पाहता याठिकाणी भाजप-शिंदेसेनेची जोरदार तयारी दिसत आहे. दुसरीकडे निवडणुकीत लागणार्या ‘रसद’च्या मोठ्या गणितामुळे काँग्रेस अद्याप बॅकफूटवरच दिसत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या होत्या. या रखडलेल्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला आहे. बऱ्याच कालावधीनंतर होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचाली वेगाने सुरू होण्याची अपेक्षा असताना महाविकास आघाडीमध्ये मात्र कमालीची शांतता पाहायला मिळत आहे. महायुतीचे वाढते संख्याबळ, भाजप-शिंदेसेनेची आक्रमक तयारी आणि निवडणुकीत लागणार्या ‘रसद’च्या मोठ्या गणितामुळे काँग्रेसचे अंतर्गत वातावरण पूर्णपणे थंडावल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरल्यावर लागणारा आत्मविश्वास, रणनीती आणि जोश काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दिसत नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात भाजप आणि शिंदेसेनेनंतर काँग्रेसकडे सर्वाधिक मतदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने जोरदार लढत देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी फारसे इच्छुक पुढे येताना दिसत नाहीत. एकेकाळी विधान परिषदेसाठी काँग्रेसमध्ये मोठी स्पर्धा व्हायची. उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांकडून शक्तिप्रदर्शन, वरिष्ठांच्या भेटीगाठी, लॉबिंग आणि गटबाजी रंगायची. परंतु यंदा परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चा ‘रसद’च्या मुद्द्यावर सुरू आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताकद, मतदार संपर्क आणि राजकीय व्यवस्थापन आवश्यक असते. ही रसद कोण लावणार आणि किती लावणार? हा प्रश्न काँग्रेसमधील (Congress) अनेक इच्छुकांसमोर उभा ठाकल्याने अनेकांनी सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत पक्षात अपेक्षित उत्साह दिसत नसल्याची चर्चा आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडे सध्या केवळ एका इच्छुकाने अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केली असल्याचे माहिती सूत्रांने दिली आहे. मात्र, संबंधित इच्छुकानेही केवळ काँग्रेसवर विसंबून न राहता इतर पर्यायांची चाचपणी सुरू केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात अनिश्चिततेचे वातावरण अधिक गडद झाले आहे. भाजप (BJP) आणि शिंदेसेना मात्र पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
यवतमाळ-वाशीम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांचे गणित, संघटनात्मक पकड आणि आर्थिक ताकद यामुळे महायुतीची बाजू सध्या भक्कम मानली जात आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अनेक नेते आधीच बचावात्मक भूमिकेत गेल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसने तातडीने रणनीती आखली नाही तर विधान परिषद निवडणुकीत महायुतीला थेट वॉकओव्हर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काही दिवसांत काँग्रेसमध्ये हालचाली वाढतात की पक्षाची शांतताच कायम राहते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगरसेवकांमध्ये अस्वस्थता?
महाविकास आघाडीतील ही शांतता आता नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकार्यांनाही अस्वस्थ करू लागली आहे. निवडणूक रंगतदार झाली तर नगरसेवकांचे महत्व वाढते, विविध गाठीभेटी होतात आणि राजकीय हालचालींनाही वेग येतो. मात्र सामना एकतर्फी झाला तर नगरसेवकांची राजकीय किंमत आणि संभाव्य ‘रसद’ दोन्ही कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काँग्रेस ही निवडणूक लढणार आहे. आमच्याकडे जिल्हातील सक्षम उमेदवार आहे. योग्य वेळी नाव सर्वासमोर येईल. काँग्रेसकडे जास्त जागा असल्याने या जागेवर काँग्रेसच लढणार आहे, असे यवतमाळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. सचिन नाईक यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.