यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. ही निवडणूक बिनविरोध झाल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी महाविकास आघाडीच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीसमोर महाविकास आघाडीने माघार का घेतली? असा सवाल करत त्यांनी स्वपक्षातील नेत्यांनाच धारेवर धरले आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होणे ही बाब आपल्याला अजिबात पटलेली नाही, असे पुरके यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून या निवडणुकीबाबत चर्चा करायला हवी होती. निवडणूक लढवण्याऐवजी बिनविरोध निवडीचा मार्ग स्वीकारणे योग्य नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर थेट निशाणा साधला. अध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवार देऊन निवडणूक लढवण्याची गरज होती. त्यात पराभव झाला असता तरी हरकत नव्हती; मात्र लढण्याची तयारी दाखवायला हवी होती, अशी भूमिका त्यांनी मांडली. "हरलो असतो तरी चाललं असतं, पण लढायला हवं होतं"; असे म्हणत त्यांनी पक्षातील नेत्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी महायुतीच्या नेत्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे बुके देऊन स्वागत करणाऱ्या संचालकांवरही वसंतराव पुरके यांनी टीका केली. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते महायुतीसमोर शरणागती पत्करतातच कसे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपसोबत केलेली ही तडजोड काँग्रेसच्या मूळ विचारधारेला बाधक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करून संबंधित नेत्यांना जाब विचारणार असल्याचा इशाराही पुरके यांनी दिला.
दरम्यान, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भूमिकेवर वसंतराव पुरके यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात पक्षांतर्गत राजकारणात काय घडामोडी होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.