Maratha Reservation Sarkarnama
विदर्भ

Maratha Reservation : आरक्षणासाठी राज्यभरात पाच हजार उमेदवार रिंगणात

जयेश विनायकराव गावंडे

Maratha Reservation : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले मराठा समाजाचे आंदोलन आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा समाज लोकसभा निवडणुकीवर ‘फोकस’ करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास मराठा समाजाने हा इशारा दिला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मराठा समाजाचे बैठकसत्र पार पडत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न मराठा समाजाकडून केला जाण्याची शक्यता आहे. अशात मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलेल्या मागण्यांवरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. येत्या काही दिवसांत लोकसभेचा रणसंग्राम होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक सध्या लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत. दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारा मराठा समाज आता सत्ताधाऱ्यांना निवडणुकीपूर्वी घेरण्याच्या तयारीत आहे. तशी तयारी देखील होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा समाजाच्या बैठकांचे सत्र यासाठी पार पडत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्याचा निर्णय यात घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाही तर, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. लोकसभेसाठी प्रत्येक गावातून दोन अर्ज, तब्बल पाच हजारांवर उमेदवार देणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याही विरोधात उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात हजारो मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरण्यासह आगामी निवडणुकीत मराठा आरक्षणाला पाठिंबा न देणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत. प्रचारसभेत सहभागीही होणार नाहीत. संबंधित उमेदवाराला मतदान करणार नाहीत, अशी शपथ घेण्यात येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठीत केली जाणार आहे. या एसआयटीला विरोध म्हणून प्रत्येक मराठा समाजबांधव आमची देखील चौकशी करा, अशी मागणी करणार आहे. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सरकारला घेरण्याची शक्यता आहे. केवळ मराठा समाजातीलच उमेदवार नव्हे तर इतर समाजातील देखील लोकांना या निवडणुकीत सरकारच्या विरोधात उभे करण्यात येणार असल्याची माहिती आहे. जोपर्यंत सगेसोयरे या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मराठा समाज कोणत्याही नेत्याच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचा ठराव बहुमताने घेण्यात आला आहे.

बीड, अहमदनगरमध्ये बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी बैठकसत्र आयोजित करण्यात आले होते. अनेक ठिकाणी बैठकांचे नियोजन होत आहे. बीड,अहमदनगरमध्ये बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहेत. दुसरीकडे विदर्भातील अनेक जिल्ह्यात बैठक होणार आहे. अकोल्यातही मराठा समाजाची बैठक होणार आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT