Nitin Raut
Nitin Raut Sarkarnama
विदर्भ

बैठक रद्द केली; मेस्मा लावणार, पण राज्य अंधारात जाऊ देणार नाही…

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांना मी काल विनंती केली होती की, संप मागे घ्या आणि चर्चेला या. त्यासाठीच आज मुंबईत बैठक आयोजित केली होती. संघटनांनी काल सकारात्मकता दाखवली पण आज संप मागे घेतला नाही. त्यामुळे आजची बैठक रद्द केली. पण त्यांच्यासाठी चर्चेची दारं खुली आहेत. काहीही झाले तरी राज्य अंधारात जाऊ देणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.

दरम्यान संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा (Mesma) लावण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी (Energy Minister) दिले आहेत. राज्यात कोळशाचं मोठं संकट आहे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये तरी आम्ही वीज पुरवठा थांबवणार नाही आणि राज्याला अंधारात लोटणार नाही. लोडशेडींग करणार नाही. कर्मचाऱ्यांचे विषय चर्चेच्या माध्यमातून सोडविले जाऊ शकतात. त्यासाठी मी त्यांना कुटुंबप्रमुख म्हणून विनंती केली होती. त्यांनी आज सराकात्मक उत्तर दिलं नाही. युनियनच्या नेत्यांनी सांगितले की बैठक घ्या, पण संप मागे न घेतल्यामुळे मी बैठक घेणार नाही, असे नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले.

बैठक रद्द केली असली तरी संघटना येऊन भेटू शकतात. चर्चेची दारं मी बंद केली नाही. राज्यात विजेचा तुटवडा जाऊ देणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करत आहो. आमच्या विभागाचे प्रधान सचिव कंट्रोल रुममध्ये आहेत. कंपनीचे सीएमडीही तेल डोळ्यात टाकून काम करत आहे. संपावर असतानाही जे कर्मचारी कामावर आले त्यांना सलाम करतो. त्यांनी राज्याच्या हितार्थ काम केले आहे. संघटनांना अजूनही विनंती आहे की, सलोखा आणि संधी याचा पुरेपूर फायदा घ्यावा. महाविकास आघाडी म्हणून आम्ही संवाद साधण्यासाठी तयार आहोत. ऊर्जामंत्री नात्याने कर्मचाऱ्यांचा कुटुंबप्रमुख आहे. या नात्याने त्यांनी राज्याला सहकार्य करावे, अशी विनंती करतो, असेही डॉ. राऊत म्हणाले.

काल मी नागपुरातून संघटनांच्या नेत्यांशी व्हिसीवर चर्चा केली, तेव्हा त्यांनी सकारात्मकता दर्शविली. चर्चेला येऊ म्हणाले. संप मागे घेतल्यानंतर बैठक घेऊ, अशी माझी भूमिका होती. पण ते संप मागे घेणार नसतील तर बैठक कशाला घ्यायची, असा प्रश्‍न डॉ. राऊत यांनी केला. बैठक जरी रद्द केली, तरी युनियनचे नेते चर्चेसाठी येणार असतील तर मी उपलब्ध आहे, असे त्यांना सांगितले आहे. कर्मचारी संघटनांनी बोलणी करायची तयारी दाखवली आहे. कर्मचाऱ्यांनी संप मिटवावा, अशी माझी अजूनही त्यांना विनंती आहे. जे कर्मचारी कामावर परतणार नाहीत, त्यांच्यावर मेस्मा लावणार आहोत, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT