Nitin Gadkari News Lok Sabha Election 2024: Sarkarnama
विदर्भ

Nitin Gadkari News : नितीन गडकरींंच्या 'या' एका निर्णयाने अधिकाऱ्यांच्या पोटात आणला गोळा

BJP Nitin Gadkari Nagpur Politics : नागपूर महापालिकेत सुमारे अडीच वर्षांपासून प्रशासक आहे. अधिकारी ऐकत नाहीत, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात असे आरोप माजी नगरसेवकांचे आहेत.

Rajesh Charpe

Nagpur News : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम यावेळी थेट नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात होणार आहे. ते विधानसभा मतदारसंघनिहाय समस्या ऐकूण घेणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

नागपूर (Nagpur) महापालिकेत सुमारे अडीच वर्षांपासून प्रशासक आहे. अधिकारी ऐकत नाहीत, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात असे आरोप माजी नगरसेवकांचे आहेत. सध्या डेंगीची साथ जोरात पसरली आहे. असे असतानाही महापालिकेचा आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आहेत.

अलिकडेच महापालिका प्रशासनाच्या विरोधात शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आंदोलन केले. नागरिकांचा रोष लक्षात घेऊन स्वतः गडकरी यांनी पुढाकार घेऊन आपला जनता दरबार मनपाच्या मुख्यालयातच घेण्याचे ठरवले आहे.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) प्रत्येक महिन्यात खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात जनसंपर्क कार्यक्रम घेतात. यावेळी चार ऑगस्टला ते सिव्हिल लाईन येथील महापालिकेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मनपाशी संबंधित नागरिकांच्या समस्यांची विधानसभानिहाय सुनावणी करतील. याप्रसंगी महापालिका आयुक्त, अन्य अधिकाऱ्यांसह इतर मान्यवरही गडकरी यांच्या समवेत उपस्थित असणार आहे. नागरिकांनी आपल्या समस्या या जनसंपर्क कार्यक्रमामध्ये मांडण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

जनसंपर्काला होणारी गर्दी लक्षात घेता, नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये तळमजल्यावर काउंटर लावले जाईल. या काउंटरवरून नागरिकांना टोकन नंबर दिले जातील. या टोकन नंबरनुसारच नागरिकांना गडकरी यांच्यापुढे समस्या मांडण्यासाठी पाठविले जाईल.

जनसंपर्क कार्यक्रमात येणाऱ्या समस्यांची नोंद घेऊन शक्य त्या प्रकरणात तातडीने कार्यवाहीची सूचना गडकरी देतील. जास्त कालावधी लागणाऱ्या प्रकरणात अर्जदारांना लेखी स्वरुपात सूचित केले जाईल. प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींबाबत कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात यावा, असे गडकरी यांनी महापालिका प्रशासनाला सुचविले आहे.

महापालिकेच्या मुख्यालयात होत असलेल्या जनसंपर्क कार्यक्रमात सकाळी 11 ते दुपारी पाऊण वाजेपर्यंत पूर्व, उत्तर आणि मध्य नागपूर या तीन विधानसभा मतदारसंघातील मनपाशी संबंधित समस्या जाणून घेतल्या जातील. त्यानंतर दुपारी 1 ते 3 या वेळेत दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील समस्या जाणून घेणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT