Akola News : विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे एकहाती आणि तितक्याच ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा किल्ला लढवत असतात. तसेच ते विरोधी पक्षांसह अजित पवारांवर टीका करणार्यांना खडेबोल सुनावण्यासही कधीच मागेपुढे पाहत नाही. त्यांच्याकडे अजितदादांचे निकटवर्तीय आणि लाडके आमदार म्हणूनही पाहिले जाते.
पण हे अमोल मिटकरी (Amol Mitkari) गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. यातच आता आणखी एक भर पडली आहे. त्यांना थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे.
अजित पवारांसह (Ajit Pawar) 40 हून अधिक आमदारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली.या फुटलेल्या आमदारांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या आश्रयाला जाण्याचा निर्णय घेतला आहे.तसे पक्षप्रवेशही होताना दिसून येत आहे.
एकीकडे महायुतीतील भाजप आणि शिवसेना पक्षांना शरद पवारांकडून एकावर एक धक्के दिले जात आहे. बंडखोरांचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्याबरोबरच दुसरीकडे अजित पवार पक्षाचे तडफदार आणि आक्रमक नेते गळाला लावण्याचं कामही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरू असल्याचं आता समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील एका बड्या नेत्यांनं थेट अजित पवारांचे फायरब्रँड नेते अमोल मिटकरींना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ऑफरमध्ये मिटकरींना थेट विधानसभा निवडणुकीत पक्षाचं स्टार प्रचारक पद, सत्ता आल्यानंतर राज्यमंत्रिपद आणि पुन्हा एकदा विधान परिषदेची संधी देणार असल्याची माहिती समोर आली आहे.पण ही ऑफर आमदार मिटकरींनी नाकारली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ऑफरबाबत अमोल मिटकरी म्हणाले,ऑफरच्या बातम्यांमध्ये तथ्य आहे. पण काहीजणांशी आपले सौजन्याचे नाते असल्यामुळं काही गोष्टी बोलता येत नाही. मात्र, याबाबत आपण सगळं आमच्या नेत्यांना कळवलं आहे असंही मिटकरी यांनी सांगितले.
तसेच मिटकरी म्हणाले, अजितदादांशी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत गद्दारी करणार नसल्याचं संबंधित नेत्याला सांगितलं आहे.माझ्या सात पिढ्या अजित पवारांच्या ऋणातून उतराई होणार नाही. त्यांनी माझ्यासारख्या छोट्या समूहातील,सामान्य कुटुंबातील व्यक्तिला मोठं पद दिलं आहे. त्यामुळं त्या नेत्याच्या विचाराशी मी कधीही प्रतारणा करणार नाही असंही मिटकरींनी मीडियाशी बोलताना म्हटलं.अजितदादांसमोर सर्व ऑफर शून्य असल्याच्या भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
आपल्याला माझ्या पक्षापेक्षा दुसरा कोणताही पक्ष मोठा नसून माझ्या नेत्यापेक्षा दुसरा कोणताच नेता मला मोठा नाही.त्या नेत्याचं नाव आहे अजितदादा आहे.त्यांची आपण शेवटच्या क्षणापर्यंत साथ सोडणार नाही असंही मिटकरींनी अगदी निक्षून सांगितले.
मिटकरी म्हणाले, आमच्या पक्षात मला काहीच अडचण नाही.मी खुल्या मनाने पक्षात माझी भूमिका मांडत आहे.मला मंत्रिपद,आमदारकी यांचा मोह नाही. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला आला नसल्याचं रोखठोक मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.