Congress on Shiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भरपूर वेळ आहे. परंतु अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जायला किंवा त्यांच्यासाठी बैठक घ्यायला अजिबात वेळ नाही, अशी टीका दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी केलीय.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्यानं अमरावती येथील भानखेडा परिसरातील हनुमान गढी येथे शिवकथाकार प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन केलय. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावती दौऱ्यावर आहेत. शिंदे यांच्या या दौऱ्यावर आमदार वानखडे यांनी आक्षेप नोंदवलाय.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालय. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमरावतीत येत आहे. त्यांना राणा दाम्पत्यानं आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये जायला वेळ आहे, परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही, असं आमदार वानखडे म्हणाले. नागपूर येथे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे.
अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर फारशी चर्चा झाली नाही. जी चर्चा झाली, ती पुरेशी नाही. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अमरावती दौऱ्यादरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयात किमान पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घ्यायली तरी हवी होती, अशी अपेक्षा आमदार वानखडे यांनी व्यक्त केली. परंतु अशी उदारता मुख्यमंत्र्यांना दाखविता आली नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अजिबात गंभीर नाही, असा जोरदार प्रहार करीत ते म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं प्रचंड प्रमाणात नुकसान झालय. पीक विमा देणाऱ्या कंपन्या एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये अशी नुकसान भरपाई देत शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. सरकारने या कंपन्यांना कडक भाषेत समज द्यायला हवी. केवळ एक रुपयात विमा काढून काहीही होणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेची भरपाई मिळत नाही, तोपर्यंत ही योजना केवळ पोकळ आहे.
राज्यातील पंचनाम्यांची कार्यवाही आता पूर्ण झाली आहे. त्यामुळं राज्य सरकारने हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर करणं गरजेचं आहे. कोणतेही भुलभुलय्या असलेलं पॅकेज जाहीर न करता मुख्यमंत्र्यांनी सरसकट नुकसान भरपाईचे पॅकेज राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी जाहीर करावं, अशी मागणीही आमदार बळवंत वानखडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलीय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.