MLA Subhash Dhote, Congress. Sarkarnama
विदर्भ

स्वपक्षीयांच्या एकापाठोपाठ आरोपांनी आमदार सुभाष धोटे अस्वस्थ, कसा साधणार समन्वय ?

अशा परिस्थितीत आमदार धोटेंची (MLA Subhash Dhote) बाजू सावरण्यासाठी गोंडपिपरी तालुका काँग्रेस (Congress) कमिटीचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार सरसावले आहेत.

संदीप रायपूरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष धोटे ठरावीक कार्यकर्त्यांना महत्व देतात. त्यामुळे तालुक्यात काँग्रेस पक्षाचं वाटोळं होत आहे, असा आरोप गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष राजीव चंदेल यांनी केला होता. त्याच दरम्यान कॉंग्रेस नेते, बाजार समितीचे सभापती सुरेश चौधरी यांचे चिरंजीव राहुल चौधरी यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. सतत होणाऱ्या आरोपांमुळे आमदार धोटे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.

अशा परिस्थितीत आमदार धोटेंची (MLA Subhash Dhote) बाजू सावरण्यासाठी गोंडपिपरी तालुका काँग्रेस (Congress) कमिटीचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार सरसावले आहेत. काँग्रेसमध्ये सर्वांना सन्मानजनक वागणूक मिळत असतानाही काही ज्येष्ठ कार्यकर्ते केवळ अहंकारातून आमदारविरोधी भाष्य करीत आहेत. आमदार धोटे यांना राजुरा विधानसभा मतदारसंघात दुस-यांदा नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या काळात त्यांनी चांगली कामे केली आहेत. ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सन्मानजनक पदे दिली. गावागावांतील कार्यकर्त्यांशी समन्वय साधला. पण केवळ वैयक्तिक अहंकारापोटी काहींनी आमदारविरोधी भूमिका घेतली असल्याचे संगमवार यांनी सांगितले.

पक्षातीलच लोकांनी आमदारांवर एकापाठोपाठ एक आरोप करणे चुकीचे आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघातील गोंडपिपरी तालुका विधानसभेचा शिलेदार ठरवितो. मागच्या विधानसभा निवडणुकीत गोंडपिपरी तालुक्यातील मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाने आमदार सुभाष धोटे यांना दुसऱ्यांदा विजयाची चव चाखता आली. अशात आता पक्षातील काही ज्येष्ठ कार्यकर्ते आमदारांविरोधात जाहीर भूमिका घेऊ लागले आहेत. त्यामुळे ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.

आता गोंडपिंपरी तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार यांनी तालुक्यात पक्ष मजबूत होत असल्याचे म्हटले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होऊ घातल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांची सेना यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या निकालानंतर आगामी निवडणुकांबाबतची स्थिती स्पष्ट होऊ शकते. अशा स्थितीत काँग्रेसमधील ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांमधील समन्वय आमदार सुभाष धोटे कसा साधतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT