DPC Meeting of Akola. Sarkarnama
विदर्भ

Akola : आमदार म्हणाले; काय सांगता साहेब, माझ्या घराशेजारीच चालतो वरलीचा अड्डा!

जयेश विनायकराव गावंडे

Radhalkrishna Vikhe Patil : सातत्याने वाढत चाललेली गुन्हेगारी, अवैध धंदे आणि पोलिसांचे दुर्लक्ष यावरून शनिवारी (ता. 6) पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘लाँग डिस्टन्स’वरून ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ने घेतलेली अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक चांगलीच गाजली.

शिवसेना उद्धव ठाकरे गटातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी ‘माझ्या घराशेजारीच वरली-मटका चालतो,’ अशी धक्कादायक माहिती भर सभेत दिली आहे. शहरातील कॅफेत अश्लील प्रकार चालतात, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत आमदार देशमुख यांच्यासह मूर्तिजापूर भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनीदेखील पत्रातून तक्रार केली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी कृषिनगरजवळच्या तोष्णीवाल ले-आऊटमध्ये राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याची चाकूने हत्या करण्यात आली. हा विद्यार्थी बाहेरगावाहून शिक्षणासाठी अकोल्यात आला होता. क्षुल्लक कारणावरून ही हत्या करण्यात आली. हा मुद्दाही गाजला.

अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही अनेकांनी विविध मुद्दे उपस्थित केले. काही महिन्यांपूर्वीच अकोल्यात भीषण जातीय दंगल घडली होती. त्यात एकाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून अकोला पोलिस दलावर सातत्याने आरोप होत आहेत. अगदी दोनच दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बच्चन सिंग यांना नियुक्त करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कॅफेंमध्ये चालणाऱ्या अश्लील प्रकारांचे धक्कादायक व्हिडीओही आपल्याकडे असल्याचा दावा आमदार देशमुख यांनी केला. पालकमंत्री यांनी हे व्हिडीओ आपल्या स्वीय सहायकांकडे पाठवावे, अशी सूचना केली. शिकवणी वर्गाच्या परिसरात तरुणींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावण्याची मागणी अकोला पूर्वचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केली. शहरातील गुन्हेगारीवर निगराणीसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करावी. पोलिसांकडून ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ कार्यान्वित करण्यात यावे. त्यासाठी अहमदनगर व राज्यात इतर ठिकाणी असलेल्या सेंटरचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करावा. निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक, पोलिस पथकांना अधिक सक्रिय करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

नरनाळा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वनविभागाच्या परवानगीसाठी स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल. आलेगाव येथील बाळासाहेब ठाकरे शेतकरी भवनाचे काम पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ग्रामीण भागासाठी मातोश्री पाणंद रस्ते योजना, शेतरस्ते, पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश त्यांनी दिलेत. मातोश्री पाणंद रस्ते योजनेत निधी येऊनही कामे पूर्ण झाली नाहीत, अशी तक्रार अनेकांची आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘महाराजस्व’ अभियानात या कामांना गती द्यावी. कामचुकारपणा होत असेल तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असेही पालकमंत्री म्हणाले.

सभेत 2022-23 साठी सर्वसाधारण योजनेतील 214 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेतील 86 कोटी 17 लाख व आदिवासी उपयोजनेतील 12 कोटी 47 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. सर्वसाधारण योजनेत 250 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेत 88 कोटी व आदिवासी उपयोजनेत 12 कोटी 49 लाखांचा मंजूर नियतव्यय आहे. योजना व उपयोजनांतील प्राप्त निधीशी खर्चाची टक्केवारी केवळ 32.21 टक्के आहे. त्यामुळे मान्यता मिळालेली कामे पूर्ण करावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिलेत.

Edited by : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT