Protest for Old Pension Sarkarnama
विदर्भ

Nagpur Winter Session : आडबाले, वंजारींनी पुन्हा रेटली जुन्या पेन्शनची मागणी

Old Pension : विधान भवन परिसरात टोप्या, टी-शर्ट घालत वेधले लक्ष

सतीश हरिश्चंद्र येटरे

Vidhan Bhavan News : जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर विदर्भातील दोन आमदारांनी केलेलं आंदोलन मंगळवारी (ता. 12) हिवाळी अधिवेशन काळात विधान भवन परिसरात सर्वांचे लक्ष वेधून घेणारं ठरलं. नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर आडबाले आणि काँग्रेसचे नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी हे आंदोलन केले.

जुन्या पद्धतीने निवृत्तीवेतन मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार नागो गाणार यांनीही शिक्षकांच्या जुन्या पेन्शनठी लढा दिला होता. जोपर्यंत जुनी पेन्शन मिळणार नाही, तोपर्यंत आमदारकीचे लाभ घेणार नाही असं त्यांनी विधान परिषदेत जाहीर केलं होतं.

गाणार यांच्यानंतर आता आमदार आडबाले आणि वंजारी यांनी आता पुन्हा जुन्या पेन्शनसाठी जोरदार लढा सुरू केलाय. या मागणीसाठी मंगळवारी विधान भवनावर मोर्चाही काढण्यात आला.

यावेळी बोलताना शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर आडबाले म्हणाले की, आमचं एकच मिशन आहे की, जुनी पेन्शन मिळावी. सर्वोच्च न्यायालायाने यासंदर्भात निकाल दिलेला आहे. हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे.

जोपर्यंत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार नाही. तोपर्यंत लढा कायम राहणार आहे. जुन्या पेन्शनच्या विषयावरच आपण निवडणूक लढविली होती. त्यामुळे दिलेला शब्द पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले.

आमदार अभिजित वंजारी म्हणाले की, जुनी पेन्शन हा केवळ शिक्षकांचा प्रश्न नाही. सरकारमधील सर्वच कर्मचाऱ्यांची ती जुनी मागणी आहे. कर्मचाऱ्यांची ही मागणी रास्त आहे. ही मागणी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार सुधाकर आडबाले आणि आपण पुन्या पेन्शनशी संबंधित टोप्या, टी-शर्ट आणि दुपट्टे घालून विधिमंडळात आलो आहोत.

यातून सरकारचं लक्ष वेधलं जावं आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा हा हेतू आहे. सरकारने यासंदर्भात पुनर्विचार करावा. गेल्या अधिवेशनात सरकारने याबाबत आश्वासन दिले होते. अद्यापही याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर काही वर्षांपूर्वी सरकारने स्पष्ट शब्दात नकार दिला होता. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात यासंदर्भात समिती नेमण्यात येईल व त्यावर विचार करण्यात येईल असं आश्वासन सरकारनं दिलं होतं.

परंतु त्यानंतर बराच काळ गेल्याने आता कर्मचाऱ्यांमधील अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेसने आता या आंदोलनात उडी घेतली असून मंगळवारी काढण्यात आलेल्या मोर्चाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही संबोधित केले.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT