Narendra Darade, Dhananjay Munde and Neelam Gorhe Sarkarnama
विदर्भ

Monsoon Session 2023 : उत्तम बोलतो तो नेक आहे, धनंजय मुंडे, हे सर्वांमध्ये एक आहे; नरेंद्र दराडेंनी घेतल्या टाळ्या…

Narendra Darade : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमावर त्यांनी सडकून टिका केली.

सरकारनामा ब्यूरो

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. दरम्यान आमदार नरेंद्र दराडे यांनीही या चर्चेत भाग घेतला. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमावर त्यांनी सडकून टिका केली. मात्र कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. (He praised Agriculture Minister Dhananjay Munde)

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आज (ता. २१) सभागृहात बोलताना आमदार दराडे म्हणाले. राज्य सरकारतर्फे सद्यःस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमावर वारेमाप खर्च केला जात आहे. या कार्यक्रमात गाड्या, एसटी बसेस पाठवून लोक आणले जातात. त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दिले जातात. हा पैसा अशा पद्धतीने खर्च न करता थेट शेतकऱ्यांसाठी त्या रकमेतून काही कामे केली, तर तेवढाच त्यांचा फायदा होईल, असे म्हणत त्यांनी सरकारच्या कामावर ताशेरे ओढले.

एकीकडे सरकारच्या कार्यपद्धतीवर तोंडसुख घेत असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आमदार दराडेंनी स्तुतिसुमने उधळली. त्यांच्यासारखा कृषिमंत्री आजवर झाला नाही, असा त्यांच्या कवितेचा आशय होता. ते म्हणाले...

‘वटला होता तो चेक आहे, शिजला होता तो केक आहे.. उत्तम बोलतो तो नेक आहे, कृषिमंत्री अनेक झाले असतील.. पण धनंजय मुंडे, हे सर्वांमध्ये एक आहे...’ ही कविता सादर करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. नरेंद्र दराडेंचे भाषण अगदी सुप्रीम कोर्टा’च्या आदेशाप्रमाणे झाले आणि वेळेत झाले, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

कृषिमंत्र्यांनी हिंगोली, भंडारदरा आदी ठिकाणी बोगस बी बियाणे आणि खतांवर बंदी घातली. यापूर्वी बोगस बियाणे, खतांमुळे शेतकरी हैराण झाले होते. खताच्या किमती कमी होत नाहीत, ही मोठी समस्या आहे. केंद्र सरकारने ५० हजार कोटी रुपयांची तरतूद केली. तरीही बोगस खते विकली जातात. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. कांद्यासाठी ३५० रुपये अनुदान सरकारने द्यायचे ठरवले पण आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते अद्याप मिळाले नाही.

अटी जास्त असल्यामुळे अनुदानाचे वाटप झाले नाही. हमीभाव दिला पाहिजे. कांदा, कापूस, सोयाबीन एकाही पिकाच्या नुकसानाची मदत अद्याप मिळालेली नाही. सरकारकडून फक्त घोषणाच केल्या जात आहेत. प्रत्यक्ष कृती होताना दिसत नाही. नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची घोषणाही हवेतच विरली. नाशिक जिल्ह्यात एकालाही अनुदान मिळाले नाही.

यापूर्वीच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारच्या वेळी दीड लाख रुपये अनुदान देण्यात आले होते. त्यावर विद्यमान सरकारने दोन लाख रुपये देण्याची हमी दिली होती, ती पूर्ण केली नाही. ठाकरेंनी बांधावर जाऊन पैसे दिले होते. बॅंकेत ठेवी ठेवलेल्या शेतकऱ्यांनाही (Farmers) कर्ज मिळालेले नाही. राज्य सरकारने बॅंकांना ७०० कोटी रुपये दिले, तरच शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची शक्यता आहेत. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) मंजूर केलेल्या कामांवरील स्थगिती उठवण्याची सूचना आमदार दराडे यांनी सभागृहाला केली.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT