Morshi Mutton Party Controversy; CM Devendra Fadnavis And Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Mutton Party Controversy : शिवसेनेच्या नगराध्यक्षांवरील कारवाईसाठी भाजपकडून फिल्डिंग; आमदारांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

BJP Against Shinde Shivsena Over Amravati Morshi Municipal Council Mutton Party Controversy : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीवर झालेल्या मटण पार्टीवरून महायुतीमधील भाजप आणि शिंदेसेनेत वादाची ठिणगी पडली आहे.

Aslam Shanedivan

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर आयोजित करण्यात आलेल्या 'मटण पार्टी'वरून महायुतीतील भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार वाद निर्माण झाला आहे. नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

भाजपचे आमदार उमेश यावलकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शासकीय इमारतीचा अशा प्रकारे वापर करणे नियमबाह्य आणि निषेधार्ह असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणात भाजपने शिंदे गटाच्या नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने, काँग्रेसचे उपनगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नगरसेवक आणि मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि शिंदेसेनेमधील स्थानिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

भाजप आक्रमक; नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

मोर्शी नगरपरिषदेच्या छतावर झालेल्या मटण पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार उमेश यावलकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत या संपूर्ण प्रकाराची तक्रार केली. शासकीय इमारत ही सार्वजनिक कामकाजासाठी असताना तिचा खासगी मेजवानीसाठी वापर करणे चुकीचे असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

या प्रकरणात नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने, उपनगराध्यक्ष, संबंधित नगरसेवक आणि मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. तसेच प्रशासनाने या प्रकरणात कोणतीही राजकीय भूमिका न घेता दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.

शिवसेनेचे स्पष्टीकरण

दुसरीकडे, भाजपने केलेले आरोप शिवसेनेने फेटाळून लावले आहेत. दोन अधिकाऱ्यांच्या बदलीनिमित्त आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामागे कोणताही चुकीचा उद्देश नव्हता, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. शिवसेनेचे नगरसेवक रवी गुल्हाने यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

यापूर्वी भाजपच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षांनीही नगरपरिषदेत सुमारे २०० ते २५० लोकांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी भाजपने आक्षेप का घेतला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्याचा वाद हा केवळ आपल्या नेत्यांची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक निर्माण केला जात असल्याचा आरोपही रवी गुल्हाने यांनी केला. त्यामुळे मटण पार्टीवरून सुरू झालेला वाद आता भाजप विरुद्ध शिवसेना अशा राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस; चौकशीला सुरुवात

दरम्यान, या प्रकरणाची अमरावती जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला नोटीस बजावून संबंधितांकडून खुलासा मागवला आहे. या प्रकरणात १६ नोव्हेंबर रोजी पुराव्यांसह स्वतः उपस्थित राहून खुलासा सादर करण्याचे आदेश नोटिशीद्वारे देण्यात आले होते. नोटिशीत राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाणीटंचाईचा उल्लेख करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शासकीय कार्यालयात झालेला हा प्रकार पदाला अपेक्षित असलेल्या आचरणाशी विसंगत असून, त्यामुळे शासकीय कार्यालयाची प्रतिमा मलीन झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. तसेच संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे समजते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा भाजपचा इशारा

मोर्शी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने यांच्याकडून या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी भाजपने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार जिल्हा प्रशासनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्याविरोधात कारवाईची मागणीही भाजपने लावून धरली आहे. त्यामुळे मोर्शी नगरपरिषदेतील मटण पार्टीचा वाद आता जिल्हा प्रशासनाच्या चौकशीपुरता मर्यादित न राहता महायुतीतील अंतर्गत संघर्षाचा मुद्दा बनला आहे. या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार आणि भाजप-शिवसेनेतील हा वाद कोणते नवे वळण घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT