BJP Politics In Shirur : शिरूरमध्ये विरोधकांचा 'गेम ओव्हर'! भाजप सत्तेत, सत्तेची दोन्ही महत्त्वाची पदे पाचर्णे कुटुंबाकडे; नगरपरिषदेत विरोधकच उरला नाही

Shirur Municipal Council Politics : शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात भाजपच्या खेळीने नगरपरिषदेत विरोधकच उरला नसल्याचे सध्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Shirur Municipal Council
Shirur Municipal CouncilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात सध्या एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. नगरपालिकेत सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, असा प्रश्न निर्माण झाला असून, विरोधी बाकांवर बसण्यासाठी एकही नगरसेवक शिल्लक राहिलेला नाही. भाजपने सत्ताधारी शिरूर नगरपरिषद गटाला पाठिंबा दिल्यानंतर नगरपालिकेतील सर्वच पक्ष सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यातच भाजपचे नितीन पाचर्णे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष अशी दोन्ही महत्त्वाची पदे पाचर्णे कुटुंबाकडे आली आहेत.

शिरूर नगरपरिषदेत एकूण २४ नगरसेवक असून, भाजपचे ११, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पाच आणि एक अपक्ष नगरसेवक आहे. निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत 'शिरूर नगरपरिषद गट' स्थापन केला होता. या गटाच्या माध्यमातून नगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यात आली. मात्र, राजकीय समीकरणे बदलल्यानंतर भाजपने याच गटाला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

या राजकीय बदलाचा पहिला मोठा परिणाम उपनगराध्यक्षपदावर झाला. तत्कालीन उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. हा ठराव २० विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाल्याने गादिया यांना पद सोडावे लागले. त्यानंतर रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन मच्छिंद्र पाचर्णे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

Shirur Municipal Council
BJP Politics : महापालिकेत 'गोकुळ'ची पुनरावृत्ती; स्वीकृत नगरसेवकांचा आनंद ठरला क्षणभंगुर!

मात्र, या निवडीपेक्षाही नगरपालिकेतील विरोधी पक्षाचे अस्तित्व संपल्याची राजकीय चर्चा अधिक रंगली आहे. भाजप सत्ताधारी गटात सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाने या गटातून आम्हाला बाहेर काढावे, अशी मागणी करणारे पत्र आमदार ज्ञानेश्वर कटके, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र, या पत्रावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे या पक्षाचे पाचही नगरसेवक कागदोपत्री सत्ताधारी गटातच असल्याचे चित्र आहे. परिणामी, नगरपालिकेत विरोधी पक्षाचा एकही नगरसेवक उरलेला नाही.

दरम्यान, नगराध्यक्षपदी ऐश्वर्या पाचर्णे आणि उपनगराध्यक्षपदी नितीन पाचर्णे अशी दोन्ही पदे एकाच कुटुंबाकडे आल्याने पाचर्णे कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाला नवे बळ मिळाले आहे. शिरूर-हवेलीचे माजी आमदार स्व. बाबूराव पाचर्णे यांचे शिरूर नगरपालिकेत पाचर्णे कुटुंबाचा नगराध्यक्ष असावा, हे स्वप्न होते.

Shirur Municipal Council
BJP Politics : विधानपरिषद निवडणूक जिंकलेल्या दोन आमदारांचा 48 तासांत भाजपमध्ये प्रवेश; मुख्यमंत्र्यांच्या डावाने विरोधकाच्या गोटात खळबळ!

नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता उपनगराध्यक्षपदही कुटुंबाकडे आल्याने त्यांच्या राजकीय वारशाला महत्त्वाचे यश मिळाल्याची भावना समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे. गेल्या चार-पाच दशकांपासून शिरूर शहर आणि परिसराच्या राजकारणात प्रभाव असलेल्या पाचर्णे कुटुंबाला नगरपालिकेतील सत्तेची दोन्ही प्रमुख पदे प्रथमच मिळाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.