Morshi Municipal Council Mutton Party Sarkarnama
विदर्भ

Morshi Municipal Council Mutton Party : एकनाथ शिंदे शिवसेना सत्ताधीश असलेल्या मोर्शी नगरपरिषदेच्या छतावर रंगली 'मटण पार्टी'; नगराध्यक्षांची सावरासावर, जिल्हाधिकाऱ्यांची शिस्तभंगाची नोटीस

Mutton party at Morshi Municipal Council building in drought-hit Amravati sparks controversy. Collector issues notice to chief officer as BJP demands action : अमरावतीच्या मोर्शी नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी आणि नगरसेवकांच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे; महायुतीमधील मित्रपक्ष भाजप प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात आक्रमक झाला असून, यावर नगराध्यक्षांकडून सावरासावर सुरू आहे.

Pradeep Pendhare

Amravati Municipal Council Controversy : एकनाथ शिंदेंची सत्ता असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीवर शासकीय कार्यालय बंद असताना, 'मटण पार्टी' केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दुष्काळी परिस्थितीत झालेल्या या 'मटण पार्टी'ची अमरावती जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला नोटीस काढत, शिस्तभंगाच्या कारवाईला सुरूवात केली आहे. दरम्यान, मोर्शी नगरपरिषदेत नगराध्यक्षा प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने यांनी या 'मटण पार्टी'वर सावरासावरी सुरू करण्यास सुरूवात केली असली, तरी महायुतीमधील मित्रपक्ष भाजप या पार्टीवरून आक्रमक झाला आहे.

अमरावती जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. शेतकरी (Farmer) या काळात वेगळ्याच संकटातून जात आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला समोरे जावे लागत असताना, मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर, कार्यालय बंद झाल्यानंतर, रात्रीच्या अंधारात 'मटण पार्टी' झाली. सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झाल्यावर सुरूवातीला तसे काहीच झाले नाही, अशी भूमिका घेतली होती. परंतु या 'मटण पार्टी'चा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर मोर्शी शहरात संतापाची लाट उसळली.

प्रशासकीय इमारतीवरच्या 'मटण पार्टी'चा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नगर परिषदेतील (Municipal Council) कर्मचारी, अधिकारी आणि नगरसेवक सहभागी असल्याचे समोर आले. रात्री उशिरापर्यंत ही 'मटण पार्टी' सुरू होती. पार्टीतला एक-एक प्रकार जसा समोर येत गेला, तसे मोर्शीतील राजकीय वातावरण चांगलेत तापले. महायुतीमधील मित्रपक्ष भाजप या 'मटण पार्टी'वर चांगलाच आक्रमक झाला आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या पार्टीच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी, मोर्शी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी पराग वानखडे यांना नोटीस बजावली आहे. 16 नोव्हेंबरला पुराव्यांसह स्वतः हजर राहून खुलासा सादर करण्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी बजावलेल्या नोटीशीत म्हटले आहे. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाणीटंचाई असताना, शासकीय कार्यालयात झालेला हा प्रकार, पदास अपेक्षित असलेल्या आचरणाशी विसंगत असून यामुळे शासकीय कार्यालयाची प्रतिमा मलीन झाल्याचे नोटीशीत म्हटले आहे.

मित्रपक्ष भाजप मुख्य अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक

भाजपने या प्रकारावर प्रशासनाचा निषेध केला. मुख्य अधिकारी पराग वानखडे यांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. मोर्शी नगरपरिषद हे मनोरंजन स्थळ बनवले आहे. प्रशासन आणि सत्ताधारी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षाच्या संगनमताने झालेली ही 'मटण पार्टी' होती. शहराची पवित्र इमारतीवर ही 'मटण पार्टी' घेऊन सत्ताधाऱ्यांनी त्याचे पावित्र भंगवले आहे, या प्रवृत्तीचा भाजपकडून निषेध आहे. या प्रकाराची जिल्हा प्रशासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करून मुख्य अधिकारी वानखडेंविरोधात कारवाईची मागणी लावून धरणार असल्याचा इशारा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला.

नगराध्यक्षांची सावरासावरी

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नगरपरिषदेतील नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने यांनी या 'मटण पार्टी'वर सावरासावर केली आहे. दोन अधिकाऱ्यांच्या बदलीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी, दिवाळीनिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सर्वांना निमंत्रित करण्यात आले होते, कोणताही चुकीचा उद्देश नव्हता, असे नगराध्यक्ष गुल्हाने यांनी सांगितले.

नगराध्यक्षांच्या सावरासावरीवर जोरदार टीका

नगराध्यक्षा गुल्हाने यांनी केलेल्या या सावरासावरीवर, टीका होऊ लागली आहे. रात्री उशिरापर्यंत स्नेहमिलनाचा कोणता कार्यक्रम सुरू राहतो, प्रशासकीय इमारतीच्या छतावरच हा कार्यक्रम का घेतला, इमारतीच्या समोर देखील घेता आला असता, दिवाळीचा हा कार्यक्रमाला सर्वपक्षीय का नव्हता, शहरातील सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठीत लोकांना, इतर पक्षातील कार्यकर्त्यांना का आमंत्रित केले नव्हेत, प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना का बोलावले नव्हते, असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून, या 'मटण पार्टी'च्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT