MP Bhavana Gawli Sarkarnama
विदर्भ

‘वर्षा’बाहेर अर्धा तास बसलेल्या भावना गवळी रिकाम्या हातांनी परतल्या

गवळी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सक्तवसुली संचनलयाच्या (ईडी) रडारवर असलेल्या वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना आज (ता. १ ऑक्टोबर) पक्षश्रेष्ठींकडून अनपेक्षित धक्का बसला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी खासदार गवळी या वर्षा बंगल्यावर गेल्या होत्या. मात्र, अर्धा तास वाट पाहूनही त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळू शकली नाही, त्यामुळे त्यांना ठाकरे यांना न भेटताच परत यावे लागले, अशी माहिती सूत्रांनी दिली. (MP Bhavana Gawli could not meet Chief Minister Uddhav Thackeray)

भावना गवळी यांच्यावर बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यात १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यानंतर ईडीकडून गवळी यांचा कारखाना आणि शिक्षण संस्थांवर छापेमारी करण्यात आली होती, तसेच खासदार गवळी यांच्या कंपनीचे संचालक सईद खान यांना ईडीने अटक केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खासदार गवळी यांच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येत आहे. गवळी यांच्या कंपनीचा संचालक खान ह्याला ईडीकडून अटक झाल्यानंतर त्यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता पक्षश्रेष्ठींकडूनही दिलासा मिळत नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान, ईडीकडून होत असलेल्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर खासदार भावना गवळी ह्या आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेल्या होत्या,. मात्र, त्यांना वर्षावर एन्ट्री मिळाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्या जवळपास अर्धा तास मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट होण्यासाठी वाट पाहत थांबल्या होत्या. मात्र, त्यांना भेट मिळू शकली नाही. अखेरीस अर्धा तास वाट पाहून खासदार गवळी ह्या ठाकरे यांची भेट न घेताच माघारी परतल्या, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

महिला उत्कर्ष ट्रस्टचे कंपनीत रूपांतर करून त्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप खासदार गवळी यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी तक्रार केल्यानंतर ईडीने खासदार गवळी यांच्याशी संबधित कंपनी आणि शैक्षणिक संस्थांवर छापेमारी केली होती. यामध्ये रिसोडनजीकच्या देगाव येथील बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना, भावना पब्लिक स्कूल, डीएमएलटी कॉलेज, शिरपूरचे वरिष्ठ महाविद्यालय या संस्थांचा समावेश आहे. दरम्यान, केंद्रातील भाजप सरकार ईडीचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप शिवसेनेकडून होत आहे. खासदार भावना गवळी ह्याही लवकरच तुरुंगात जातील, असा दावा सोमय्यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT