मुंबई : काॅंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अंतापूरकर यांचा मुलगा जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या आज होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (Jitesh Antapurkar's candidature from Congress for Deglur Biloli by-election confirmed)
आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार येत्या ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. काँग्रेसकडून अंतापूरकर यांचे चिंरजीव जितेश अंतापूरकर यांना संधी मिळणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट होत आले आहे. काँग्रेसच्या आजच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
एकीकडे काँग्रेसकडून अंतापूरकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असताना भारतीय जनता पक्षाकडे मात्र तुल्यबळ उमेदवारी दिसत नाही. त्यामुळे भाजपकडून या ठिकाणी पंढरपूर पॅटर्न राबविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, शिवसेनेचे सुभाष साबणे येथून लढण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र, महाविकास आघाडीत असल्याने शिवसेना या ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे साबणे हे भाजपकडून लढण्यासाठी इच्छूक आहेत. सुभाष साबणे हे माजी आमदार असून त्यांनी अंतापूरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे.
देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीच्या संदर्भात मुंबईत भाजपची काल बैठक झाली आहे. त्यात साबणे यांच्या नावाची चर्चा झाल्याचे समजते. भाजपकडे सध्या तुल्यबळ उमेदवार नसल्याने माजी आमदार सुभाष साबणे यांना या पक्षाकडून संधी मिळू शकते. मात्र, सुभाष साबणे हे शिवसेना सोडून भाजपकडून उमेदवारी घेणार का, याकडे मात्र नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या लोकसभा मतदारसंघातील हा विधानसभा मतदारसंघ असून तो काॅंग्रेसकडेच राखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलूर-बिलोली मतदारसंघातून २००९ मध्ये निवडणूक लढवत विजय मिळवला होता. पुन्हा २०१९ मध्येही रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणेंचा पराभव करत दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली होती.
या पोटनिवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही ८ ऑक्टोबर आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवार ठरविण्यासाठी बैठकांची लगबग सुरू आहे. उमेदवारी अर्जांची छानणी ११ ऑक्टोबर रोजी होणार असून १३ ऑक्टोबर ही माघारीची तारीख आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.