MP Sunil Mendhe Gets Angry. Sarkarnama
विदर्भ

Gondia : रुग्णालयातील तुटवड्यामुळे खवळले खासदारांचे रक्त; त्यानंतर जे घडले...

अभिजीत घोरमारे

Health Department News : बाई गंगाबाई महिला रुग्णालयात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याने महिला रुग्णांचा होणारा त्रास पाहता भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यांनी गोंदिया येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन लावत याप्रकाराचा जाब विचारला. फोनवरून त्यांच्या क्लास घेतला. भविष्यात रक्ताचा तुतवडा भासू नये म्हणून आवश्यक ते उपाय करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

खासदार मेंढे यांचा वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संभाषणाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. श्रीराम रथयात्रेत असताना मेंढे यांना रक्ताच्या तुटवड्याबद्दल माहिती मिळाली. त्यांनी प्रवासात असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोनवरून याबाबत विचारणा केली.

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत येणाऱ्या स्थानिक बाई गंगाबाई रुग्णालयात जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रक्तपेढीत तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी रक्तपेढीत धाव घेऊन पैसे मोजावे लागतात. अनेकांना रक्त खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. शासकीय रक्तपेढीचा उपयोग होत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे.

गोंदिया येथे असलेल्या शासकीय महिला रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. बाई गंगाबाई महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी महिला दाखल होतात. त्यामुळे या ठिकाणी रक्ताची दररोज मोठी गरज भासते. बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात सरासरी 15 बाटल्या रक्ताची गरज दररोज भासते. शहरात 25 पेक्षा अधिक नर्सिंग होम आहेत. त्यांना देखील याच रक्त पेढीतून 20 ते 25 बाटल्या सरासरी दररोज लागतात. त्यांची मागणीही मोठी असते. या रक्तपेढीतून दररोज 50 पेक्षा अधिक बाटल्या रक्ताची मागणी आहे. दररोज सरासरी 70 बाटल्या रक्तसंकलन होणे येथे गरजेचे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही महिन्यांपासून रक्तपेढीत अनेक रक्तगटाचा तुटवडा निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील रक्तपेढीत 1 हजार बाटल्या रक्त साठविण्याची क्षमता आहे. त्या तुलनेत संकलित होणाऱ्या रक्ताचे प्रमाण कमी आहे. स्टोअर क्षमता अधिक असूनही रक्तसंकलनाचे प्रमाण कमी असल्याने येथे नेहमीच तुटवडा असतो. लोकांमध्ये रक्तदान करण्याबाबत जनजागृती करण्यात गोंदिया वैद्यकीय महाविद्यालय तथा आरोग्य विभाग कमी पडत आहे. यासंदर्भात जनजागृतीही करण्यात येत नाही. ही बाब खासदार सुनील मेंढे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना केल्या.

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत मतदार संघात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी केली. रक्तदानाबाबत जनजागृतीसाठी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. भविष्यात रक्तदानासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे यावे, यासाठी मदत घेण्याची सूचनाही त्यांनी केली. आपणही रक्तदान शिबिर घेणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT