Sudhir Mungantiwar and Jayant Patil
Sudhir Mungantiwar and Jayant Patil Sarkarnama
विदर्भ

मुनगंटीवार थेटच बोलले, म्हणाले तुम्ही गेले नाही म्हणून उपमुख्यमंत्री झाले नाही जयंतराव..!

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : मुख्यमंत्री (Chief Minister) विशाल हृदयाचे आहेत आणि गरिबों के सन्मान पुरी ताकद से मैदान मे, या भावनेतून काम करणारे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आहेत. २ कोटी ३० लाख ५८ हजार ५२५ मतदारांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला झटका देत भाजप-शिवसेना युतीला कौल दिला. तो महाराष्ट्रातील जनतेचा आवाज होता. पण दुर्दैवाने ज्यांना राम म्हणजे कथेतील काल्पनिक पात्र वाटतं, अशा पक्षांसोबत आमच्यासोबत हिंदुत्वाची भाषा बोलणारे गेले, असा घणाघाती आरोप मुनगंटीवार यांनी केला.

महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून ते गडहिंग्लजच्या जनतेने २४ ऑक्टोबर २०१९ ला १६१ आमदारांना विजयी करत महाराष्ट्राची सेवा करण्याचा कौल दिला. पण त्यांनी तेव्हा दगा दिला, असे शिवसेनेचे नाव न घेता मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले. विश्‍वासदर्शक प्रस्तावावर अभिनंदन करण्याची आवश्यकता होती. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व ज्यांनी स्वीकारले, ते आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाचे पालक झाले. त्यांचं अभिनंदन करावं, असा आजचा प्रसंग होता. पण यावेळी दुःख आणि सत्ता गेल्याची वेदना आपण बघत होतो.

अशाही परिस्थितीत अजित पवारांचे कौतुक केले पाहिजे, कारण आजचा दिवस येण्यासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष त्यांनीही मदत केलीच आहे. पण भाषणामध्ये मात्र, तुम्ही तिकडे गेले, आता कसे निवडून याल, अशी विचारणा झाली. त्यावर २३ नोव्हेंबर २०१९ मध्ये तुम्ही जसे तिकडून इकडे आले, अन् उपमुख्यमंत्री झाले. हा तुमचा आदर्श आहे, असे उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. इकडून तिकडे गेल्याने पराभूत होत नाही जयंतराव, (Jayant Patil) तुम्ही गेले नाही म्हणून उपमुख्यमंत्री झाले नाही. आता मनात पक्का विचार ठेवा. कारण कधीतरी एखादी अशी उडी मारावी लागते. हे मनात ठासून घ्या, असे मुनगंटीवारांनी जयंत पाटलांना सुनावले.

आज बहुमतात हे सरकार आलं, आणि तुम्ही रडण्याचा कार्यक्रम सुरू केला, असे टोला विरोधकांना हाणला. एकही दिवस सत्तेविना तुम्ही राहू शकत नाही का, असा सवालही केला. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्याने उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले, त्यावरही तुम्ही माचीस घेऊन आग लावण्याचे काम करता, असेही मुनगंटीवार यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात सुनावले.

ज्यांना फक्त खुर्चीच माहिती आहे. त्यांचे आयुष्य वंशवाद, घराणेशाही चालवण्यात जात आहे. ‘मै और मेरा परिवार, बाकी सब बेकार’, या उक्तीवर जे काम करतात, त्यांना सेवा, समर्पण कधी कळलंच नाही, याचं दुःख या भिंती ऐकत होत्या. लढण्यासाठी कार्यकर्ता झेंडा हाती घेणार. मग झेंडा तुम्ही उचलायचा आणि कार्यकर्त्यांच्या हाती फक्त दंड द्यायचा. या लोकांना सर्वकाही आपल्या कुटुंबातच पाहिजे, अशी तोफ सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर डागली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT