Murder in Pinjar Village of Akola. Sarkarnama
विदर्भ

Akola : अल्पवयीन चुलतभावानेच भावासोबत केले असे कृत्य की, अख्खे शहरच हादरले

Crime Incident : बारा दिवसांनंतर झाला सातवर्षीय बालकाच्या हत्येचा उलगडा

जयेश विनायकराव गावंडे

Murder News : सातवर्षीय बालक हरविल्याची तक्रार अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. बारा दिवसांनंतर या बालकाची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. बालकाच्या 17 वर्षीय चुलतभावानेच त्याला मारले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या घटनेचा तपास करून गुन्हा उघडकीस आणला. घटनेमुळे दोन्ही भावांच्या कुटुंबाला धक्का बसला असून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. हरवलेल्या मुलाचा मृतदेहच आढळल्याने पिंजर भागात खळबळ उडाली होती. मुलाचा गळा दाबून खून करण्यात आला होता. त्यानंतर त्याला विहिरीत ढकलून देण्यात आले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सखोल तपास करीत मारेकऱ्याला अटक केली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर गाव आहे. येथील रहिवासी शेख अय्यूब बागवान यांचा सातवर्षीय मुलगा शेख अफ्फान 19 डिसेंबरपासून अचानक बेपत्ता झाला होता. त्याचा कुटुंबाकडून शोध घेतल्यानंतर तो सापडला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी पिंजर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. शेख अफ्फानचे वडील शेख अय्यूब बागवान यांनी अफ्फानचा शोध लावणाऱ्याला किंवा खात्रीशीर माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. बार्शीटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद अबरार सय्यद मीर यांनीही 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एकूण 1 लाख 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस याप्रकरणी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतरही मुलाचा शोध लागला नाही.

पोलिसांनी याप्रकरणी खबरे कामाला लावले. 29 डिसेंबरला श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने पिंजरपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील अकोला रोडवरील एका शेतातील विहिरीपर्यंत अफ्फानचा शोध घेतला. पोलिसांनी विहिरीत डोकावून पाहिले असता शेख अफ्फानचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसून आला. मुलाच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. अफ्फानचा मृत्यू घातपात असावा, असा संशय पोलिसांना होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अफ्फानच्या शवविच्छेदन अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा होती. अनेकांची चौकशी करण्यात आली. संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर खरा मारेकरी पोलिसांच्या हाती लागला. मृतक शेख अफ्फान शेख अय्यूब या सातवर्षीय बालकाची हत्या त्याच्याच 17 वर्षीय चुलतभावाने केल्याचे समोर आले. चुलतभावासह शेख अफ्फान शेतातील विहिरीच्या बाजूला असलेल्या बंद खोलीतील कबुतरे पकडण्यासाठी गेले होते. विहिरीच्या बाजूला असलेल्या खोलीच्या खिडकीत शेख अफ्फानला पोते पकडून बसविले. त्यानंतर अफ्फानच्या भावाने खोलीमधून कबुतरांना बाहेर काढले. अफ्फानने कबुतरांना सोडून दिले, असा गैरसमज चुलतभावाचा झाला. त्यामुळे त्याने त्याचा गळा आवळला व त्याला धक्का दिला. अफ्फान खिडकीला लागूनच असलेल्या विहिरीत कोसळला व त्याचा मृत्यू झाला.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT