Crime News : यवतमाळ जिल्हा एका धक्कादायक घटनेने हादरला आहे. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेत दुचाकीला कट लावण्याच्या क्षुल्लक वादातून देशी कट्ट्याने गोळी झाडून युवकाची हत्या करण्यात आली आहे. संतप्त जमावाने आरोपीची दुचाकी जाळली. ही घटना यवतमाळ शहरातील कळंब चौकात मंगळवारी रात्री घडली. पोलिसांनी मारेकऱ्याला जेरबंद केले असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
शादाब खान रफीक खान असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. मनीष सागर शेंद्रे असे आरोपीचे नाव आहे. ६ फेब्रुवारी रोजी रात्री यवतमाळ शहर पोलिस स्टेशन हद्दीतील आरटीओ ऑफिस चौकातून कळंब चौक परिसरात आरोपी मनीष सागर शेंद्रे हा त्याच्या मैत्रिणीसोबत जात होता. यातील शादाब खान रफीक खान याला वाहनाचा कट लागला. त्यामुळे आरोपी व हत्या झालेल्या युवकांमध्ये बाचाबाची झाली. मैत्रिणींसमोर झालेल्या या क्षुल्लक वादावादीमुळे मनीष व्यथित झाला. त्याचा अहंकार दुखावला गेला.
त्यामुळे मनीष घरी जाऊन देशी कट्टा घेऊन परत कळंब चौक येथे आला. मृत्यू झालेल्या शदाबला त्याने जाब विचारला. तेव्हा दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. आरोपी मनीष शेंद्रे याने त्याच्या जवळच्या देशी कट्ट्याने शादाबवर गोळी झाडली. त्यामध्ये खान याच्या छातीत गोळी लागली. त्याला लोकांनी तातडीने शासकीय रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान शादाब खान याचा मृत्यू झाला. या वेळी संतप्त नागरिकांनी आरोपीची दुचाकी पेटवून दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखेचे आधार सिंग सोनोने, अवधूतवाडीचे ठाणेदार ज्ञानोबा देवकते, यवतमाळ शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश चवरे यांनी घटनास्थळ गाठले. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले.
तातडीने पोलिसांनी तपास चक्रे फिरवत मनीषला अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सध्या परिसरामध्ये शांतता असून, पोलिस स्टेशन हद्दीमध्ये ‘फिक्स पॉइंट’ व अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेसंबधाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश चवरे यांनी केले आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.