A municipal election office in Nagbhid where several candidates, including Vanchit and NCP nominees, faced nomination rejection during scrutiny impacting the local election landscape. Sarkarnama
विदर्भ

Municipal council election : प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, तर ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वीच झाले बाद...

Nagbhid municipal election : जिल्ह्यातील दहा नगर पालिका आणि एका नगर पंचायतमधील नगरसेवकांच्या २५३ जागांसाठी शेवटच्या दिवशी (सोमवार) एकूण १,५४५ नामांकन दाखल झाले. नगराध्यक्ष पदाच्या ११ जागांसाठी १२१ दावेदार रिंगणात उतरले होते. आज झालेल्या छाननीत नागभीडमध्ये वंचित उमेदवारांच्या अर्जावर सूचकांची संख्या अपुरी असल्याचे निष्पन्न झाले.

Rajesh Charpe

Chandrapur News, 19 Nov : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगरपालिकेत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला. वंचितचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह ६ नगरसेवकांचे अर्ज छननीत बाद ठरवण्यात आले आहे.

त्यामुळे आता या उमेदवारांना निवडणूक लढण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. दुसरीकडे वरोरा येथील अजित दादांच्या तर घुग्गुसमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांनाही घरी बसावे लागणार आहे.

सूचकांची संख्या अपुरी असल्याने वंचितचे अध्यक्षपदाचे उमेदवार चंदन कोसे यांच्यासह सहा नगरसेवकांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. घुग्घुसमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या शोभा ठाकरे यांचा, तर वरोऱ्यात मनीषा विलास नेरकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज त्रुटीमुळे बाद करण्यात आला.

जिल्ह्यातील दहा नगर पालिका आणि एका नगर पंचायतमधील नगरसेवकांच्या २५३ जागांसाठी शेवटच्या दिवशी (सोमवार) एकूण १,५४५ नामांकन दाखल झाले. नगराध्यक्ष पदाच्या ११ जागांसाठी १२१ दावेदार रिंगणात उतरले होते. आज झालेल्या छाननीत नागभीडमध्ये वंचित उमेदवारांच्या अर्जावर सूचकांची संख्या अपुरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांचे अर्ज बाद झाले.

प्रभाग क्र. ९ मधील अपक्ष मनीषा मानापुरे यांचेही नामांकन रद्द झाले. भिसी नगर पंचायतीत अपक्ष उमेदवार विक्की कटारे, मनोज गेंगणे, हनुमान गेडाम आणि संजय खोब्रागडे यांचे नगराध्यक्ष पदाचे अर्ज फेटाळण्यात आले. गडचांदूरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या अकरा अर्जांपैकी एक अर्ज बाद झाला. ब्रह्मपुरीत भाजपचे अरविंद नंदूरकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता; परंतु एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला.

प्रभाग ८ मधील वंचितच्या भारती जांभुळकर, प्रभाग १० मधील भाजपच्या छाया वानखडे आणि प्रभाग ११ मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे सूरज ठवरे यांचेही नामांकन रद्द झाले. भद्रावतीत नगराध्यक्ष पदाचे तीन अतिरिक्त अर्ज त्रुटींमुळे रद्द झाले. वरोरा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाचे दोन नामांकन अपात्र ठरले. नगरसेवक पदासाठी आलेल्या १७१ अर्जांपैकी १३ अर्ज रद्द झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT