Nagpur News: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तब्बल पंचवीस वर्षानंतर यावेळी विधानसभेच्या निवडणुकीतून ब्रेक घेतला आहे. त्यांच्या ऐवजी त्यांचे चिरंजीव सलील देशमुख यांच्या हाती तुतारी दिली आहे. मात्र काटोल- नरखेड विधानसभा मतदारसंघातील अनिल देशमुखांची कमतरता मतदारांना भासणार नाही याची काळजी अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनिल देशमुख यांना उभे करून त्यांना अधिकृत घड्याळ चिन्ह दिले आहे. त्यामुळे येथे मतदानाच्या दिवशी मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत तुतारी विरुद्ध निपानी असा समाना रंगला होता. याचा जबर फटका तुतारीच्या उमेदवाराला बसला होता. आता काटोलमध्ये घड्याळ आणि अनिल देशमुख असे समीकरण राष्ट्रवादी काँग्रेसने जुळवून आणले आहे. अनिल देशमुख 1995 पासून सातत्याने विधानसभेची निवडणूक लढवत आले.
युती आणि आघाडीच्या काळात ते मंत्री होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना राज्याचे गृहमंत्रीपद देण्यात आले होते. या पंचवीस वर्षांच्या काळात ते फक्त एकदा 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी त्यांना पराभवाचा धक्काही दिला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना त्यांनी घरोघरी घड्याळ पोहचवले आहे. घड्याळ, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार हीच त्यांची राजकीय शिदोरी आहे. 2024 ची निवडणूकसुद्धा तेच लढणार होते. पुत्र सलील देशमुख यांच्या आग्रहामुळे त्यांनी निवडणुकीतून थांबा घेतला आहे.
अनिल देशमुख यांची मतदारसंघातील लोकप्रियता बघून राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरे अनिल देशमुख शोधून आणले आहेत. ते नरखेड तालुक्यातील थुगाव (निपाणी) येथील रहिवासी आहे. त्यांच्या वडिलांचे नाव शंकरराव आहे. माजी मंत्री अनिल देशमुखांच्या वडिलांचे नाव वसंतराव आहे. एवढाच फरक दोघा देशमुखांमध्ये आहे.
अजित पवार (Ajit pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अतिशय गोपनीय पद्धतीने सर्व प्रक्रिया पार पाडली. कालपर्यंत त्यांचे उमेदवार देशमुख यांना कोणीच ओळखत नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनासुद्धा त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती नव्हती. निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जाची छाननी केल्यानंतर अनिल देशमुख (घड्याळ) असे चिन्ह यादीत दिसतात अनेकांना धक्का बसला.
मुलाविरुद्ध वडील लढणार अशी चर्चा मतदारसंघात पसरली होती. मात्र राष्ट्रवादीचे हे दुसरेच देशमुख असल्याचे कळल्यावर सलील देशमुखांच्या समर्थकांना दिलासा मिळाला. आता घड्याळवाले देशमुख किती मते घेतात हे निकालातूनच पुढे येणार आहे. मात्र अनिल देशमुखांच्या उमेदवारीचा फटका सलील देशमुखांना बसण्याची शक्यता नाकरता येत नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.