Nagpur Vidhansabha Election: नागपूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघ आणि पक्षात बंडखोरी झाली आहे. काँग्रेस आणि भाजपच्यावतीने बंडखोरांना आवरण्याचे प्रयत्न केले जात आहेत. काही जणांना फोन करून उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आले आहे.
पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील असंतुष्टांची देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी तातडीने बैठक घेऊन समजूत काढली. मात्र वर्षभरापासून परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसच्या उमेदवाराला आव्हान देणारे नरेंद्र जिचकार यांना कसे रोखायचे असा प्रश्न आता पक्षाला पडला आहे.
जिचकार यांना पक्षातून आधीच निलंबित केले असल्याने त्यांच्यासोबत चर्चा आणि संवादाचा काँग्रेसचा मार्ग बंद झाला आहे. काँग्रेस आणि भाजपमधील असंतुष्ट आणि नाराजांना आपल्याकडे वळण्याचे जोरदार प्रयत्न जिचकारांच्या फळीमार्फत सुरू असल्याने सर्वांचेच टेन्शन वाढले आहे.
पश्चिम नागपूरचे आमदार आणि काँग्रेसचे(Congress) शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकारांचे सूर सुरुवातीपासूनच जुळत नव्हते. यातूनच त्यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला गेला होता. एक व्यक्ती एक पद आणि कार्यकाळ संपलेल्या शहर अध्यक्षांना बदलण्याच्या काँग्रेसच्या ठरावाचे काय झाले अशी विचारणा काँग्रेसच्या बैठकीत जिचकारांनी केली होती.
यावरून ठाकरे व जिचकार समर्थक आपसात भिडले होते. दोघांमध्ये चांगलाच राडा झाला होता. जिचकारांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. तेव्हाच जिचकारांना पश्चिम नागपूर विधानसभा मतदरसंघात लढण्याची घोषणा केली होती.
वर्षभरापासून त्यांनी परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून मतदरसंघात बांधणी केली. विधानसभा निवडणुकीसाठी अर्जही दाखल केला. कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही असे त्यांनी ठरवले आहे. त्यांची उमेदवारी काँग्रेससाठी अडचणीची ठरू शकते.
दुसरीकडे भाजपने(BJP) दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांना पश्चिम नागपूरची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे. येथील इच्छुकांनी फोन बंद करून आपला मूक विरोध दर्शवला आहे. एका नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीलासुद्धा जाण्याचे टाळले.
भाजपातील हा असंतोष जिचकारांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदारांचा फोटो जिचकारांच्या यात्रेत झळकत असल्याने आधीच येथे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.