paper leak sarkarnama
विदर्भ

Nagpur Paper Leaked : पेपरफुटी प्रकरणात ‘इनसाइड स्टोरी’ बाहेर? आरोपीच देणार साक्ष, शिपाई अटकेत

nagpur class 12 Paper Leaked : नागपूरमध्ये बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई करत पोलिसांनी मुख्याध्यापक, शिक्षकासह ६ जणांना अटक केली आहे. पण आता आणखी एक मोठा खुलासा यात समोर आला असून पेपर फोडणारे हात चपराश्‍याचे असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Aslam Shanedivan

  1. नागपूरमधील बारावी पेपरफुटी प्रकरणात चपराश्‍याच्या मदतीने प्रश्नपत्रिका फुटल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

  2. अविनाश आडे या चपराश्‍याला ताब्यात घेण्यात आले असून मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिकवणी वर्ग संचालकांचाही सहभाग समोर आला आहे.

  3. आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Nagpur News : नागपूरमधील बारावीच्या पेपर फुटीसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. याप्रकरणात पेपर फोडणारे हात चपराश्‍याचे असल्याचे तपासात उघड झाले आहे. जयताळ्यातील विद्यासाधना कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेजमधील केंद्रावर चपराश्‍याच्या मदतीनेच आरोपी संदीप सरटकर याने पेपर फोडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अविनाश आडे (वय ३५) या चपराश्‍याला ताब्यात घेतले आहे.

तर आता या प्रकरणात कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाचा, प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा आणि दोन शिकवणी वर्ग संचालकांबरोबर चपराश्‍याचा समावेश असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आधीच आठ जणांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या पेपरफुटीत मोठं रॅकेट उघड होण्याचा शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बारावी पेपरफुटी तपासात नवा धक्कादायक खुलासा समोर आला होता. बारावीचे दोन नव्हे तर तीन पेपर फुटल्याची माहिती समोर आली होती. ज्यानंतर राज्य परीक्षा बोर्डाकडून तपास सुरू झाला होता. याला राज्य परीक्षा बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला होता. तर तांत्रिक तपासात ही धक्कादायक बाब समोर आली होती. यानंतर आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून केंद्रावर चपराश्‍याच्या मदतीनेच पेपर फोडल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मुस्तफाच्या चौकशीत उघड झालेली माहिती अशी की, अविनाश आडे (वय ३५) या चपराश्‍याच्या मदतीनेच पेपर फोडला होता. तर व्हॉट्सॲपवर गणिताचा पेपर पाठवला होता. मुस्तफा याच्या शिकवणी वर्गात शिक्षक असलेला अल्ताफ गोडील याने परिचयात असलेला दिनेश कोटांगळे याला बारावीच्या विज्ञान शाखेतील विषयांचे पेपर मागितले. त्याने ‘एज्युकेशन ॲकॅडमी’चे संचालक मनीष शंभरकर याच्या माध्यमातून प्रदीप जांगडे याची भेट घेण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे प्रदीप मुख्याध्यापक असल्याने त्याला संपर्क केला. त्यानंतर प्रदीपने दुसऱ्या दिवशी सकाळी अल्ताफला कॉल करून बोलावून घेतले. याभेटीत त्याला प्रश्‍न आणि एमसीक्यू दिले.

यानंतर २१ तारखेला त्याच्या मोबाइलवर गणिताचा पेपर आणि त्याची उत्तरेही पाठविली. प्रदीपने ही प्रश्‍नपत्रिका आणि उत्तर प्राथमिक शिक्षक असलेला संदीप सरटकर याच्याकडून घेतल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली. संदीपची चौकशी केली असता, त्याने चपराशी अविनाश आडे याची माहिती उघड झाली. यानंतर आता पोलिसांनी अविनाश आडे याला ताब्यात घेतले असून आणखी काही जणांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

लाखोंची कमाई

दरम्यान संदीपकडून प्रदीप लोखंडे आणि त्यांच्या शिकवणी वर्गातील साथीदाराला बारावीच्या विज्ञान शाखेच्या विषयांचे पेपर व्हॉट्सॲपवर पाठवून लाखोंची कमाई केल्याचे समोर आले आहे. यामुळे यापूर्वीही अशाच प्रकारे केंद्रावरून पेपर फोडले आहेत का याचाही तपास पोलिसांकडून होणार आहे.

चौघांची कारागृहात रवानगी

पेपर फुटीप्रकरणात दिनेश कोटांगळे, मनीष शंभरकर, प्रदीप जांगडे, संदीप सरटकर यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांचीही कारागृहात रवानगी केली.

आडे माफीचा साक्षीदार?

विद्यासाधना कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज परिसरातच चरणदास प्राथमिक शाळा असून तिथे संदीप सरटकर प्राथमिक शिक्षक आहे. त्याने येथील चपराशी अविनाश आडे याच्यासोबत संगणमत करीत त्याच्या मदतीने सर्व पेपर फोडल्याची माहिती समोर आली. आता त्याला पोलिसांकडून माफीचा साक्षीदार बनविले जाणार असल्याची माहिती आहे.

FAQs :

1. नागपूर बारावी पेपरफुटी प्रकरणात कोणाला अटक झाली आहे?
अविनाश आडे या चपराश्‍याला ताब्यात घेण्यात आले असून यापूर्वी आठ जणांना अटक झाली आहे.

2. पेपरफुटी कशी झाली?
चपराश्‍याच्या मदतीने आरोपी संदीप सरटकर याने प्रश्नपत्रिका फोडल्याचे तपासात समोर आले आहे.

3. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे?
मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक आणि दोन शिकवणी वर्ग संचालकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

4. पोलिस तपास कुठपर्यंत पोहोचला आहे?
पोलिस अधिक तपास करत असून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

5. या प्रकरणाचा परीक्षेवर काय परिणाम होऊ शकतो?
बोर्ड परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासावर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासन कठोर कारवाई करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT