

अंजनगाव सुर्जी येथे दहावी इंग्रजी विषयाचे दोन पेपर फुटल्याचे समोर आले.
गटशिक्षण अधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
उत्तरपत्रिका सील करताना भरारी पथकाच्या झडतीत दोन पेपर कमी आढळल्याने प्रकरण उघड झाले.
Amravati : अमर घटारे
बारावी पाठोपाठ दहावीच्या इंग्रजी विषयाचे दोन पेपर फुटल्याने महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दोन उत्तर पत्रिका बाहेर सोडवून घेल्याचे आता समोर येत आहे. या प्रकरणी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथील गटशिक्षण अधिकाऱ्याना अटक करण्यात आली आहे. तर आता शिक्षण विस्तार अधिकाऱ्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणात आता सहा जणांविरोधात अंजनगाव सुर्जी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हा पेपर संपल्यावर उत्तर पत्रिका सील करण्याची कारवाई सुरू असतानाच शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने कस्टडीची झडती घेतल्यानंतर दोन पेपर कमी आढळून आल्याने उघडकीस आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 27 तारखेला दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर पार पाडला. यावेळी चक्क उत्तर पत्रिकाच बाहेरून सोडवून आणण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे घडलाय. 27 तारखेला अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई विद्यालयात इंग्रजीचा पेपर 11 ते 2 या वेळेत झाला. यावेळी अमरावतीच्या उपशिक्षण अधिकारी यांच्या भरारी पथकाने (3:30 वाजता) पेपर कलेक्शन सेंटर धाड टाकली. यावेळी एकूण किती विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली व किती उत्तर पत्रिका आहेत याची पडताळणी करण्यात आली.
या पडताळणीत एक इंग्रजी विषयाचा व एक उर्दू विषयाचा असे दोन उत्तर पत्रिका एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी असल्याच्या आढळून आल्या. त्या ठिकाणी उपस्थित असणारे गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे व विस्तार अधिकारी सुनिल कुमार अभ्यंकर यांच्याकडे विचारना करण्यात आली. यावेळी त्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही. यामुळे भरारी पथकाचा संशय बळावला.
याचदरम्यान पेपर कलेक्शन कस्टडी सेंटरमध्ये एक इसम हा संशयास्पद आढळून आला. ज्याची चौकशी केली असता तो हमाल असल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात आले. पण त्याची अधिकची चौकशी आणि झडती घेतल्यानंतर त्याच्या शर्टच्या आतमध्ये दोन पेपर खोसलेले आढळून आले. त्यावेळी जे दोन पेपर कमी होते तेच पेपर असल्याचे निष्पन्न झाले. तर हे दोन पेपर हमालाकडे कसे काय गेले? असा प्रश्न उपस्थित केला असता ते दोन्ही पेपर बाहेरून सोडवून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
त्यामुळे ते दोन पेपर परीक्षा केंद्रावरून कधी बाहेर गेले? त्यांच्यासोबत प्रश्नपत्रिका देखील बाहेर गेल्या कधी व कशा गेल्या? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर 2 वाजता संपलेला पेपर साडेतीन वाजेपर्यंत कस्टडी सेंटरवर यायला पाहिजे व पाच वाजेपर्यंत तो सीलबंद व्हायला पाहिजे असा नियम असताना मात्र तसे झाले नाही.
यामुळे या संपूर्ण प्रकारात गटशिक्षण अधिकारी सुधीर खोडे, विस्तार शिक्षण अधिकारी सुशील अभ्यंकर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हमाल अनिल हाडोळे यांच्यासह दोन अज्ञात विद्यार्थ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची संख्या ६ वर गेली आहे.
तर गटशिक्षण अधिकारी सुधीर खोडे व अनिल हाडोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर आणखी तीन आरोपी फरार आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून दहावीचे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
1. कोणत्या वर्गाचा आणि विषयाचा पेपर फुटला?
दहावीच्या इंग्रजी विषयाचे दोन पेपर फुटल्याची माहिती आहे.
2. किती जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे?
या प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3. कोणत्या अधिकाऱ्यांना अटक झाली आहे?
गटशिक्षण अधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांना अटक करण्यात आली आहे.
4. प्रकरण उघड कसे झाले?
उत्तरपत्रिका सील करताना भरारी पथकाच्या तपासात दोन पेपर कमी आढळल्याने प्रकरण समोर आले.
5. पुढील कारवाई काय अपेक्षित आहे?
पोलिस तपास सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.