Nagpur News  Sarkarnama
विदर्भ

Nagpur News : नागपूरमधील 'या' नगरसेवकांना लागले आमदारकीचे वेध

Rajesh Charpe

Nagpur News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. महाविकास आघाडी व महायुतीने तयारी सुरु केली आहे. गेली अनेक वर्षे नागपूर महापालिका गाजवणाऱ्या माजी नगरसेवकांना आता विधानसभेचे वेध लागले आहे. यापैकी अनेकजणांनी विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

शहराचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी धार्मिक व सामाजिक उपक्रमांना सुरुवात केली आहे. त्यांना भाजपने (Bjp) उमेदवारी दिल्यास त्यांची लढत माजी महापौर आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्यासोबत सामना होईल. (Nagpur News)

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे यांना दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. या दरम्यान त्यांना अ.भा. काँग्रेस कमेटीचे सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

माजी महापौर आणि विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दटके यांना आता लोकांमधून निवडून यायचे आहे. मध्य नागपूरमधून त्यांनी तयारी सुरू केली आहे. याच मतदारसंघाचे भाजपचे आमदार विकास कुंभारे हेसुद्धा महापालिकेच्याच राजकारणातून पुढे आले आहेत.

राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महासचिव व माजी नगरसेवक बंटी शेळके यांच्यासोबत त्यांची लढत झाली होती. शेळके पुन्हा तयारी करीत आहेत. याच मतदारसंघात माजी महापौर अर्चना डेहनकर या संधीच्या शोधात आहेत.

महापालिका गाजवणारे कृष्णा खोपडे आता पूर्व नागपूरचे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांना निवडणुकीत उतरवले होते. त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला होता. ते पुन्हा यावेळी संधी मागत आहेत. याच मतदारसंघातून माजी महापौर नरेश गावंडे यांनी काँग्रेसकडे आपली दावेदारी दाखल केली आहे.

माजी नगरसेवक व सत्तापक्षनेते संजय महाकाळकर यांनीसुद्धा पूर्वची मागणी केली आहे. माजी नगरसेवक व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी हा मतदारसंघ महायुतीने राष्ट्रवादीसाठी सोडावा, अशी मागणी केली आहे. ते स्वतःच येथून लढण्यास इच्छुक आहेत. माजी नगरसेविका व महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी बंडाची पूर्ण तयारी केली आहे. त्या सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.

दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांची राजकीय कारकीर्द महापालिकेतूनच सुरू झाली होती. ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. याच मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर कोहळे महापालिकेतून विधानसभेत दाखल झाले होते. गेल्या निवडणुकीत कारण नसताना आपली उमेदवारी कापल्यामुळे त्यांनी भाजपकडे दक्षिण नागपूरचीच मागणी केली आहे. उत्तर नागपूरमधून उमेदवारी द्यावी, यासाठी भाजपचे माजी नगरसेवक संदीप गवई, धर्मपाल मेश्राम यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT