Sharad Pawar : शरद पवार खरेच बोलले..! 'ही' पिढी, अन् तीही पिढी, फरक स्पष्ट आहे!

Political News : माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांची अशी पिढी मी आजपर्यंत पाहिली नाही, असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
sharad pawar
sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांची अशी पिढी मी आजपर्यंत पाहिली नाही, असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांचा रोख सातत्याने प्रक्षोभक विधाने करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्याकडे होता. वर्तमानात आणि भूतकाळात डोकावून पाहिले की शरद पवार यांच्या म्हणण्यात तथ्य आहे, हे लक्षात येईल.

दहा मिनिटे पोलिसांना बाजूला सारा, मग पाहा आम्ही काय करू, असे वादग्रस्त वक्तव्य काही वर्षांपूर्वी हैदराबाद येथील एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले होते. त्यावेळी बराच वादंग माजला होता. त्यानंतर हे वाक्य पुन्हा पुन्हा कानावर पडू लागले. त्याची बाधा महाराष्ट्रालाही झाली आहे. (Sharad Pawar News)

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे या वाक्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करू लागले आहेत. ओवेसी आणि राणे, यांना एकाच माळेचे मणी म्हणता येईल. एकमेकांच्या धर्माला उद्देशून ते अशी वक्तव्ये करत असतात.

महाराष्ट्राची राजकीय परंपरा लयास घालवण्याचे काम नितेश राणेच नव्हे, तर त्यांच्यासारख्या सर्वपक्षीय उथळ नेत्यांनी केले आहे. त्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती. माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांची अशी पिढी मी आजपर्यंत कधी पाहिली नाही, अशी टीका पवार यांनी नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांना उद्देशून केली होती.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांची पिढी कशी आहे, त्यांनी राजकारणात काय मिळवले, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. त्यांना अनेकवेळा उत्कृष्ट संसदपटू असा सन्मान मिळाला आहे. संसदेतील अभ्यासू मांडणीच्या जोरावर राष्ट्रीय राजकारणात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे.

sharad pawar
Rohit Pawar : आमदार पवारांनी सरकारला विनंती केली; सरकार किती मनावर घेणार?

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण हे दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री बनले. खासदार बनले आणि राज्यात मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशोक चव्हाण हे सध्या भाजपमध्ये आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विविध कारणांमुळे भाजपला फटका बसला. त्याची झळ चव्हाण यांनाही सोसावी लागली. नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे चव्हाण यांचे महत्व कमी होत नाही, कारण राजकारणात जय, पराजय होत असतात.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित आणि धीरज हे आमदार आहेत. अन्य एक पुत्र रितेश हे अभिनेते असून, त्यांनी हिंदी, मराठी चित्रपसृष्टीत चांगला जम बसवला आहे. काही महिन्यांपूर्वी लातूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात रितेश देशमुख यांनी राज्यातील राजकारणाच्या घसरत असलेल्या पातळीवर चिंता व्यक्त केली होती. महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय परंपरेची त्यांनी आठवण करून दिली होती. रितेश देशमुख यांचे हे भाषण खूपच गाजले होते आणि व्हायरलही झाले.

गाव तेथे कार्यकर्ता असलेले मुख्यमंत्री, असे वसंतदादा पाटील यांचे वर्णन केले जाते. वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापू पाटील हे खासदार होते. ते सांगली मतदारसंघातून पाचवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. वसंतदादांचे नातू, म्हणजे प्रकाशबापूंची मुले प्रतीक आणि विशाल पाटील यांनीही राजकारणात जम बसवला आहे. प्रतीक पाटील हे केंद्रात मंत्री होते. विशाल पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

sharad pawar
MVA News : आघाडीच्या गोटातून मोठी अपडेट; मुंबईत ठाकरेंचा वाटा मोठाच; 36 पैकी...

बॅरिस्टर अब्दुल रहेमान अंतुले यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिले मुस्लिम मुख्यमंत्री मिळाले होते. विविध निर्णयांसाठी त्यांची आजही आठवण काढली जाते. त्यांचे पुत्र नावीद अंतुले हेही राजकारणात सक्रिय होते. वडिलांच्या निधनानंतर ते राजकारणापासून दूर झाले होते. ए. आर. अंतुले यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची चांगली जाण होती, त्यांचा अभ्यासही होता. त्यामुळे त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध चांगले होते. त्यातूनच राजकारणाती नवीन इनिंग सुरू करण्यासाठी नावीद अंतुले यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनत प्रवेश केला होता. 2020 मध्ये नावीद यांचे निधन झाले.

सुशीलकुमार शिंदे यांनीही राष्ट्रीय राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आदी जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनीही राज्याच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा विजयी झाल्या आहेत. आता त्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.

sharad pawar
Vijay Wadettiwar News : गतिमान कसलं? हे तर महायुतीचे दिशाहीन सरकार; विजय वडेट्टीवारांची टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे स्थान आहे. ते त्यांनी अभ्यास आणि स्वतःच्या बळावर निर्माण केले आहे. वडील मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात आदित्य हे कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी पर्यावरण खात्याचा कार्यभार सांभाळला. पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांनी मंत्रिपदाचा काळात विविध देशांतील तज्ञांशी सतत संवाद साधला, समस्या आणि त्यावरील उपाय समजून घेतले. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. त्यांनीही स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेश जोशी हे राजकारणात सक्रिय नाहीत. कोहिनूर इन्स्टिट्यूटचा कारभार ते पाहतात.

ही झाली काही ठळक उदाहरणे. नारायण राणे वगळता एकाही अन्य कोणत्याही माजी मुख्यमंत्र्यांच्या पुढच्या पिढीने दोन समाजांत दुही पसरवणारी, महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला छेद देणारी वक्तव्ये केलेली नाहीत. आमदार नितेश राणे हे एका विशिष्ट समाजाबद्दल सातत्याने प्रक्षोभक विधाने करत आहेत, प्रार्थनास्थळात घुसून मारण्याचीही भाषा करत आहेत. शरद पवार यांनी कान टोचल्यानंतर त्यांच्या वागण्या, बोलण्यात फरक पडेल, अशी आशा निर्माण झाली होती, मात्र ती फोल ठरली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला डाग लावण्याचा हा प्रकार वेदनादायी आहे.

sharad pawar
Congress News : चंद्रपूर काँग्रेसमध्ये ‘समाजवाद'; महिला अध्यक्षांनी दिला राजीनामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com