BJP Nagpur Sarkarnama
विदर्भ

Nagpur Election: भाजप नेत्यांमध्ये भांडणं, गडचांदुरात बंडाचे झेंडे? भाजपच्या सर्व्हेनं उडवली खळबळ

Nagpur Election: भाजपच्या सर्वेत नगराध्यक्षपदासाठी ही व्यक्ती आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. मात्र, आमदारासह एका गटाला मान्य नाही.

Rajesh Charpe

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांमधील भांडणे आणि मतभेदांमुळे गडचांदूर नगर पालिकेत बंडाचा झेंडा उभा रोवला जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपच्या सर्वेत नगराध्यक्ष पदासाठी नीलेश ताजणे आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. मात्र आमदारासह एका गटाला ते चालत नाही. त्यामुळे ताजणे यांनी स्वतंत्र जुळवाजुळव सुरू केली आहे. पक्षातीलच काही नगरसेवक व इच्छुकांची त्यांनी मोट बांधली आहे. आता सर्वांचे लक्ष भाजप उमेदवाराच्या घोषणेकडे लागले आहे.

गडचांदूर नगर पालिकेत काँग्रेस–शिवसेना (उबाठा) आणि वंचित आघाडी एकत्र आले आहेत. दुसरीकडे भाजपमध्ये नगराध्यक्षपदासाठी तीव्र कलह सुरू असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडखोरी अटळ मानली जाते. २० सदस्यीय गडचांदूर नगर पालिकेत यावेळी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. मागील कार्यकाळात भाजपचे केवळ दोन नगरसेवक होते, तर काँग्रेसचा नगराध्यक्ष होता. भाजपचे वाढते आव्हान लक्षात घेऊन काँग्रेसने शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले. शेजारच्या राजुऱ्यात काँग्रेस आणि शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत; मात्र गडचांदूर येथे संघटना स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्या भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवाराच्या घोषणेच्या प्रतीक्षेत आहे.

सध्या काँग्रेसकडून वाळू व्यावसायिक सचिन भोयर यांचे नाव जवळपास निश्चित मानले जाते. भाजपमध्ये माजी नगराध्यक्ष भाग्यलक्ष्मी डोहे यांचे पती अरुण डोहे, निलेश ताजणे आणि सतीश उपलंचीवार यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र आमदार देवराव भोंगळे डोहे यांच्या उमेदवारीबाबत अधिक आग्रही असल्याचे समजते. आमदार भोंगळे आणि ताजणे यांच्यात विशेष सुसंवाद नाही. भोंगळे हे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या गटाचे आहेत.

ताजणे यांचा संबंध मुनगंटीवार–भोंगळे विरोधी भाजप नेत्यांशी आहे. त्यामुळे आमदार भोंगळे ताजणे यांच्या नावाबाबत उत्सुक नसल्याचे समजते. दुसरीकडे शेतकरी संघटना ताजणे यांच्या प्रतीक्षेत आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि शेतकरी संघटनेच्या आघाडीत त्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करण्याची रणनीती आखली जात आहे. त्यामुळे गडचांदूर नगर पालिकेत भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता वाढली आहे. आधीच राजुऱ्यात पारंपरिक विरोधक शेतकरी संघटना आणि काँग्रेस एकत्र आल्याने भाजपसमोर कडवे आव्हान तयार झाले आहे. त्यात गडचांदूर येथे बंडखोरीची झळ भाजपला बसू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT